वारणा व पंचगंगेच्या उपनदी कासारी नदीच्या जलविभाजक सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला पन्हाळा किल्ला हा इतिहासाचा साक्षीदार मानला जातो. पन्हाळा व पावनगड या जोड किल्ल्यांमुळे या डोंगररांगेचे सामरिक महत्त्व वाढले. समोर जोतिबाचा डोंगर, तर सभोवताली वारणेचे खोरे, पंचगंगेचा परिसर आणि विशाळगडापर्यंतचा डोंगरपट्टा यामुळे हा किल्ला एक बलाढ्य ठाणे ठरतो.
शिलाहारांची राजधानी
शिलाहार राजा भोज यांनी पन्हाळा किल्ला बांधून आपल्या कोल्हापूर घराण्याची राजधानी येथे स्थापन केली. वाघ दरवाजावरील मयूर आणि गरुडाची चिन्हे या किल्ल्याच्या प्राचीनतेचा पुरावा देतात. कोकण-दख्खन व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी पन्हाळ्याची निवड शिलाहारांनी केली.
शिवकालीन संघर्ष आणि पावनखिंड
1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा जिंकला. त्यानंतर सिद्दी जोहरच्या वेढ्यातून बाहेर पडताना रायाजी बांदल, बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे व शंभुसिंह जाधव यांनी पावनखिंडीत प्राणाची आहुती देत स्वराज्य वाचवले. या लढाईला मराठा इतिहासात अमर स्थान आहे.
हिरोजी फर्जंदाची शौर्यगाथा
सिद्दीच्या ताब्यात गेलेला पन्हाळा 1674 मध्ये हिरोजी फर्जंदाने अवघ्या 60 मावळ्यांसह रात्रीच्या छाप्यात पुन्हा स्वराज्यात आणला. या घटनेने पन्हाळ्याचे महत्त्व आणखी वृद्धिंगत झाले.
मराठ्यांची राजधानी
छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीहून परतल्यानंतर पन्हाळा राजधानी केला. त्यांच्या निधनानंतर महाराणी ताराराणी यांनी याच गडावरून मुघलांविरुद्ध झुंज दिली आणि कोल्हापूर संस्थानची स्थापना केली. पन्हाळा संस्थानचा कारभार वर्षानुवर्षे येथूनच चालवला गेला.
किल्ल्याची रचना व वैशिष्ट्ये
समुद्रसपाटीपासून 845 मीटर उंचीवर आणि 7 चौ.किमी. विस्तारावर पसरलेला पन्हाळा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे.
धान्यकोठारे: बहामनी व मराठाकाळातील तीन विशाल कोठारे.
दरवाजे: वाघ दरवाजा, तीन दरवाजा यांसह गुप्त मार्ग व शिल्पकला.
बुरुज: 40 पेक्षा अधिक बुरुज, त्यात काळा बुरुज व पुसाटी बुरुज विशेष.
राजवाडे: अंबारखाना, राजमाता ताराराणींचा राजवाडा, मंदिरे व प्रशासकीय इमारती.
पन्हाळा हा केवळ लष्करी किल्ला नव्हता, तर मराठ्यांच्या दूरदृष्टीचे आणि वास्तुकलेचे जिवंत उदाहरण आहे. आजही त्याच्या भव्य तटबंदी, धान्यकोठारे आणि राजवाड्यांमधून इतिहास बोलताना दिसतो.
✍️ संजय डी. ओरके
विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई




