१८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम हा भारतातील पहिला इंग्रजांविरुद्धचा उठाव मानला जातो. मात्र त्याआधीही इंग्रजांना हाकलून देण्यासाठी अनेक ठिकाणी क्रांती झाली होती. त्यातील अनेकांची नोंद इतिहासात नाही. अशाच एका दुर्लक्षित परंतु महान क्रांतीचे जनक म्हणजे आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक.
जन्म आणि पार्श्वभूमी
७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे उमाजी नाईकांचा जन्म झाला. आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव दादोजी खोमणे. त्यांच्या कुटुंबावर पुरंदर किल्ल्याचे रक्षण करण्याची जबाबदारी होती. यामुळे त्यांना “नाईक” ही पदवी मिळाली. लहानपणापासून शूर, चंचल आणि कणखर असलेले उमाजींना गुलामगिरीची चीड होती.
बंडाचे बीज
१८३० मध्ये इंग्रजांनी रामोशी समाजाकडून पुरंदर किल्ल्याची जबाबदारी काढून घेतल्याने हा समाज उपासमारीला लागला. शिवरायांच्या आदर्शाने प्रेरित होऊन उमाजींनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. गोरगरिबांना मदत करण्यासाठी त्यांनी सावकार, वतनदार आणि इंग्रजांचा खजिना लुटला. अन्याय झालेल्या स्त्रियांना भावाप्रमाणे धावून मदत केली.
गनिमी काव्याची झुंज
उमाजींनी लपूनछपून इंग्रजांवर हल्ले केले. त्यांच्या गनिमी काव्याने इंग्रज हैराण झाले.
१८२४ : भाबुर्डी येथील इंग्रजांचा खजिना लुटून देवळाच्या देखभालीसाठी खर्च केला.
१८३० : मांढरदेवी गडावर इंग्रज अधिकारी बॉईड याला पराभूत केले.
लढाईतील पराक्रम : पाच इंग्रजांचे शिरच्छेद करून इंग्रजांच्या मनात भीती निर्माण केली.
जाहीरनामा आणि इंग्रजांची भीती
उमाजींनी एक जाहीरनामा प्रसिद्ध करून जनतेला इंग्रजांविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन केले. त्यात इंग्रजांच्या नोकऱ्या सोडाव्यात, कर न द्यावा, खजिना लुटून गोरगरिबांत वाटावा, असे आवाहन होते. यामुळे इंग्रज आणखी बिथरले आणि त्यांनी “फोडा आणि झोडा” नीती अवलंबली. उमाजींना पकडण्यासाठी दहा हजार रुपये व जमीन बक्षीस जाहीर केले.
फितुरी आणि बलिदान
१५ डिसेंबर १८३१ रोजी उतरेली (ता. भोर) येथे फितुरीमुळे उमाजी पकडले गेले. देशद्रोहाचा खटला चालवून ३ फेब्रुवारी १८३२ रोजी पुण्यात त्यांना फाशी देण्यात आली. फासावर चढताना त्यांचे शेवटचे उद्गार होते – “शिवाजी महाराज की जय!”
भारताचे पहिले हुतात्मा
वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी देशासाठी प्राणार्पण करणारे उमाजी नाईक हे भारताचे पहिले क्रांतिकारक ठरले. त्यांना म्हणूनच “आद्य क्रांतिकारक” ही उपाधी लाभली. त्यांच्या बलिदानाने पुढील अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली.
आजही त्यांच्या कार्याची योग्य ओळख अनेकांना नाही. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृती जागवणे आणि त्यांचा पराक्रम नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी आदरांजली ठरेल.
✍️ श्याम ठाणेदार, दौंड, पुणे




