
जत : भाजपच्या कार्यपद्धतीला कंटाळून जत तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक महादेव हिंगमिरे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशाबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्यासोबत प्राथमिक चर्चा झाली. लक्ष्मण कोडग यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत बंद दाराआड 20 मिनिटांची चर्चा झाल्याचे समजते.

या बैठकीस राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील, सुरेश शिंदे सरकार, मन्सूर खतीब आदी मान्यवर उपस्थित होते. हिंगमिरे यांचा तालुक्यात मोठा जनसंपर्क व बहुजन समाजात नेतृत्वाचा चेहरा असल्याने त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला बळ मिळणार आहे. त्यांची पत्नी सौ. वसुधा हिंगमिरे या सध्या वाळेखिंडी ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा ठरणार असून, मोठ्या मेळाव्यात पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. यावेळी हिंगमिरे यांनी जयंत पाटील यांना वाळेखिंडीचा प्रसिद्ध पेढा भरवला, त्यावर पाटील यांनी पेढ्याच्या चवीचे कौतुक केले.




