सांगली : जत पंचायत समितीतील बांधकाम उपविभागात कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. कृष्णा नदीत नवीन पुलाखाली मृतदेह तरंगताना आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. अवधूत अशोक वडार (वय २७, रा. सांगली) असे मृत अभियंत्याचे नाव आहे.
अवधूत वडार यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून शासकीय कामात राजकीय हस्तक्षेपातून दबाव टाकला जात होता, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याच मानसिक तणावातून अवधूतने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
कुटुंबीयांनी सांगितले की, जतमधील एका आमदाराचा पीए आणि काही राजकीय व्यक्तींनी दबाव टाकत कामकाजात हस्तक्षेप केला होता. त्यामुळे अवधूत काही दिवसांपासून तणावाखाली होता. त्याने आत्महत्या केली असावी किंवा त्याचा घातपात झाला असावा, अशी शंका नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणी कुटुंबीयांनी संबंधितांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह स्वीकारणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. सकाळी दहाच्या सुमारास स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या पथकाने नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढून सांगली शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. पोलिसांनी पंचनामा करून अधिक तपास सुरू केला आहे.




