अवधूत वडार प्रकरणी सखोल चौकशीची मागणी
जत : जत पंचायत समितीतील तरुण अभियंता अवधूत वडार यांच्या मृत्यू प्रकरणी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हा मृत्यू आत्महत्या आहे की घातपात, याचा सखोल व पारदर्शक तपास व्हावा, अशी जोरदार मागणी महाविकास आघाडीने केली आहे. या पार्श्वभूमीवर आज जतमध्ये आघाडीच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सांगितले की, “अवधूत वडार यांचा मृत्यू हा अत्यंत दुर्दैवी, धक्कादायक आणि शंकास्पद आहे. या घटनेत राजकीय दबावाचा संशय नाकारता येत नाही. त्यामुळे तपास जलदगतीने व निष्पक्ष पद्धतीने होणे गरजेचे आहे.”
तसेच विद्यमान आमदारांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी केवळ बडबड केल्याचा आरोप करण्यात आला. “आपली पात्रता नसताना राज्याचे माजी मंत्री आ.जयंतराव पाटील व माझ्यावर केलेली त्यांची टीका निषेधार्ह आहे. विद्यमान आमदार जनसेवेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या सभ्य राजकीय संस्कृतीला गालबोट लागले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या पाठबळाशिवाय हे शक्य नाही,”अशी टीका आ.सावंत यांनी केली.
जत हा कायम दुष्काळी तालुका असून मतदारसंघाच्या विकासासाठी आघाडीचे नेते सातत्याने प्रयत्नशील असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. “तरुण अभियंता अवधूत वडार याला न्याय मिळाल्याशिवाय आमचा लढा थांबणार नाही,” असा इशाराही निषेध मोर्चातून देण्यात आला.
फोटोओळी
जत येथील महाविकास आघाडीचा निषेध मोर्चात बोलताना माजी आमदार विक्रमसिंह सावंत




