जत तालुक्यातील ‘या’ गावात नवे बसस्थानक; एसटीचा हिरवा कंदील, जागा संपादन प्रक्रिया लवकरच सुरू

0
690

जत : जत तालुक्यातील उमदी येथे नवीन बसस्थानक व आगार स्थापन करण्यास राज्य परिवहन महामंडळाने हिरवा कंदील दिला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठपुराव्यामुळे ही मागणी आता मार्गी लागली असून, जागा संपादनाची प्रक्रिया पूर्ण होताच उमदीला स्वतःचे बसस्थानक मिळणार आहे.

सध्या उमदी बसस्थानकावरून फक्त ३२ एसटी फेऱ्या चालवल्या जात असून, प्रवाशांना मर्यादित सेवा मिळते. नव्या आगारामुळे हैद्राबाद, अक्कलकोट, सोलापूर, चडचण अशा मार्गांवरील वाहतुकीत सोयी वाढणार आहेत.

महामंडळाच्या सांगली विभागीय कार्यालयाने सादर केलेल्या अहवालानुसार, उमदी येथे बसस्थानकासाठी वाहतूक नियंत्रक कक्ष, विद्यार्थ्यांसाठी पास कक्ष, चालक-वाहक विश्रांतीगृह, सुलभ शौचालय, कार्यशाळा, इंधन साठवणूक रॅम्प, आगार व्यवस्थापक निवासस्थान अशा सुविधा उभारणे आवश्यक आहे.

मात्र, सध्या उमदी येथे महामंडळाची मालकीची जागा उपलब्ध नसल्याने जागा संपादनाचे काम हाती घेणे गरजेचे असल्याचे सांगली विभागीय कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

उमदीपासून मंगळवेढा आगाराचे अंतर ३५ किमी असून, सध्या जत आगाराखेरीज इतर आगारांच्या फेऱ्या उमदीमार्गे नाहीत. त्यामुळे नवीन आगार उभारल्यास २० पेक्षा अधिक गावांतील प्रवाशांना लाभ होईल, तसेच कर्नाटक सीमावर्ती भागातील प्रवाशांचाही प्रतिसाद मिळेल, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

नव्या आगारामुळे उमदी व परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल, तसेच प्रवाशांची दीर्घकाळची मागणी पूर्ण होणार आहे.

📍 मुख्य मुद्दे :

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मागणीला मंजुरी

सांगली विभागीय कार्यालयाचा अनुकूल अहवाल

जागा संपादन प्रक्रिया लवकरच सुरू

उमदी व परिसरातील २० गावांतील प्रवाशांना लाभ

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here