जत : जत नगरपरिषदेच्या स्थापनेला तब्बल तेरा वर्षे उलटली असली, तरी शहराचा विकास अपेक्षित गतीने झाला नाही. मात्र आता जत नगरपरिषदेला नवी ओळख मिळणार असून विकासाच्या दिशेने मोठी झेप घेण्याची तयारी सुरू आहे.नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी तब्बल ₹10 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे,अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.
सध्या नगरपरिषदेचे कार्यालय अत्यंत दुरवस्थेत असून, मुख्याधिकारींसाठी योग्य कार्यालय, प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी आसनव्यवस्था तसेच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या बैठकीसाठी स्वतंत्र हॉलदेखील उपलब्ध नाही. या सर्व अडचणींना आता पूर्णविराम मिळणार आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत जतकरांनी विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारावर दाखवलेल्या विश्वासाला न्याय देण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, “राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जतचा सर्वांगीण विकास सुरू आहे. नवीन इमारत ही फक्त प्रशासकीय इमारत नसून, ती लोकशाहीचे पवित्र मंदिर ठरेल. या ठिकाणावरून जतच्या विकासाची नवी दिशा ठरेल.”
जत शहरातील नागरिकांमध्ये या निर्णयामुळे उत्साहाचे वातावरण असून, नगरपरिषदेच्या नव्या इमारतीमुळे शहरातील विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




