— आयुक्त सत्यम गांधी यांचा इशारा
वंटमुरे कॉर्नर, स्फूर्ती चौक व लक्ष्मी मंदिर परिसरातील विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी
सांगली :
सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी (भा.प्र.से.) यांनी शहरातील महत्त्वाच्या आणि प्रलंबित विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना व कंत्राटदारांना गुणवत्तापूर्ण आणि वेळेत काम पूर्ण करण्याचे कठोर निर्देश दिले.
या पाहणीत वंटमुरे कॉर्नर रोड, स्फूर्ती चौक ते वृंदावन व्हिला रोड आणि लक्ष्मी मंदिर ते भारत सूतगिरणी रोड या तीन प्रमुख रस्त्यांवरील कामांचा आढावा घेण्यात आला.आयुक्तांनी कामाच्या गती, गुणवत्तेचा दर्जा आणि निचरा व्यवस्थेची स्थिती तपासली.वंटमुरे कॉर्नर रोड होणार कॉंक्रिटचा रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या वंटमुरे कॉर्नर रस्त्याचे वारंवार दुरुस्तीचे प्रश्न लक्षात घेऊन, या रस्त्याचे कॉंक्रिटिकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.आयुक्तांनी “काम तांत्रिक निकषांनुसारच पूर्ण व्हावे व निचरा व्यवस्थेचे नियोजन आधीच करण्यात यावे,” असे स्पष्ट निर्देश दिले.
स्फूर्ती चौक रोडवरील ड्रेनेज काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश,स्फूर्ती चौक ते वृंदावन व्हिला रस्त्यावर सुरू असलेले ड्रेनेज काम अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. हे काम तातडीने पूर्ण करून डांबरीकरणाचे काम त्वरित सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी बांधकाम विभागाला दिले.लक्ष्मी मंदिर ते भारत सूतगिरणी रस्ता, पाणीपुरवठा व ड्रेनेज समन्वयातून पूर्ण करा.या रस्त्याची स्थिती अत्यंत खराब असून, येथे ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण झाले आहे. मात्र MIDC परिसराकडे जाणारी मुख्य पाणीपुरवठा वाहिनी अद्याप प्रलंबित आहे. दोन्ही कामे समन्वयातून तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश श्री. गांधी यांनी दिले.
पाहणीदरम्यान बोलताना आयुक्त श्री. गांधी म्हणाले,“महानगरपालिकेच्या सर्व विकासकामांमध्ये दर्जा, गती आणि पारदर्शकता या तिन्ही गोष्टींवर भर असला पाहिजे. नागरिकांना दिलासा देणारी कामे वेळेत पूर्ण करणे हीच खरी जबाबदारी आहे. यात कोणतीही कसूर खपवून घेतली जाणार नाही.”
पाहणीवेळी शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा व जलनिःसारण) चिदानंद कुरणे, उप अभियंता (इमारत व रस्ते) महेश मदने, शाखा अभियंते अशोक कुंभार, डी.डी.पवार तसेच संबंधित कंत्राटदार उपस्थित होते.




