तासगाव नगरपालिकेच्या पटावर रंगणार ‘तिरंगी सामना’

0
39

आबा-काका गटाची जुळवाजुळव फसली; नगराध्यक्षपदावरून तिरंगी लढत ठरलेली!

तासगाव नगरपालिकेच्या १२ प्रभागांतून २४ नगरसेवक आणि १ नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीचे बिगूल वाजताच तालुक्यातील राजकारण तापले आहे. सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, या वेळी पुन्हा एकदा तिरंगी लढत होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

शहरातील आणि तालुक्यातील राजकीय हालचालींवरून आबा-काका गटाच्या मनोमिलनाची चर्चा भाषणापुरतीच मर्यादित राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत तीन प्रमुख गटांमध्ये थेट सामना रंगणार आहे.

२०१६ मधील पार्श्वभूमी :

२०१६ साली झालेल्या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असा तिरंगी सामना झाला होता. त्या वेळी माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपने सत्ता काबीज केली होती. काँग्रेसच्या उमेदवारामुळे राष्ट्रवादीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार थोडक्यात पराभूत झाला होता.

गेल्या सात वर्षांत मात्र तासगावचे राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे. संजयकाका पाटील यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि आता विकास आघाडीच्या माध्यमातून पुन्हा सत्तेची लढाई लढण्यासाठी सज्ज आहेत.

सध्याची राजकीय समीकरणे :

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष) : आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चेबांधणी

भाजप : तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील आणि संदीप गिड्डे यांच्या पुढाकारातून संघटनबांधणी

विकास आघाडी : माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली सक्रिय तयारी

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांची संजयकाकांशी वाढती सलगी लक्षवेधी ठरत आहे, तर भाजप संजयकाकांशिवाय पक्षाचे अस्तित्व दाखवून देण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काही दिवसांत तासगावच्या राजकीय पटावर उलथापालथ होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

नगराध्यक्षपदासाठी तिरंगी दावेदारी :

नगराध्यक्षपदावर कोण उमेदवारी भरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विकास आघाडी : माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या पत्नींची उमेदवारी प्रबळ

राष्ट्रवादी (शरद पवार गट) : माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे यांच्या पत्नींची दावेदारी मजबूत

भाजप : शहराध्यक्ष सागर चव्हाण यांच्या पत्नींची उमेदवारी चर्चेत

या तिन्ही महिला दावेदारांच्या स्पर्धेतूनच नगराध्यक्षपदाचा खेळ ठरणार असल्याने तासगावची निवडणूक तिरंगीच नव्हे तर थरारक होणार आहे.

२०१६ चे बलाबल :

भाजप – नगराध्यक्ष + १३ नगरसेवक

राष्ट्रवादी काँग्रेस – ८ नगरसेवक

यावेळी:

१२ प्रभाग, २४ नगरसेवक आणि १ नगराध्यक्ष – एकूण २५ सदस्यांचे नवे सभागृह रचले जाणार आहे.

– तासगावचा राजकीय पट पुन्हा सज्ज, तिरंगी संघर्ष अटळ!

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here