ईश्वरपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कक्ष आणि विविध पथकांची नियुक्ती सुरू झाली आहे. येत्या २ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी सर्व तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
गेल्या नऊ वर्षांपूर्वी म्हणजे नोव्हेंबर २०१६ मध्ये पालिकेची निवडणूक झाली होती. त्या सभागृहाची मुदत २०२१ मध्ये संपल्यानंतर जानेवारी २०२२ पासून प्रशासकीय राजवट लागू झाली होती. तब्बल तीन वर्षे दहा महिन्यांनंतर आता नव्या सभागृहासाठी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
गेल्या निवडणुकीत आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाची ३१ वर्षांची सत्ता उलथवून विकास आघाडीचे निशिकांत भोसले-पाटील यांनी नगराध्यक्षपदाची बाजी मारली होती. मात्र, सभागृहात राष्ट्रवादीचे बहुमत कायम राहिल्याने समित्यांवर त्यांची पकड टिकली होती. विकास आघाडीचे १३, राष्ट्रवादीचे १४ आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आला होता.
या वेळी मात्र समीकरणे वेगळी दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीतील घटक पक्षांना विचारात न घेता माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या नावाची नगराध्यक्षपदासाठी घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. दुसरीकडे विकास आघाडी—महायुती म्हणून लढायचे की स्वबळावर, याबाबत अद्याप संभ्रम कायम असून माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे यांचे नाव चर्चेत आहे. अधिकृत घोषणा मात्र झालेली नाही.
काँग्रेसनेही स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली असून, त्यांच्याकडूनही नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उभा राहण्याची शक्यता आहे. याशिवाय शहरातील पुरोगामी, परिवर्तनवादी आणि डाव्या विचारसरणीच्या गटांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे यावेळी बहुरंगी आणि चुरशीची निवडणूक होण्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत.
मावळत्या सभागृहातील बलाबल :
नगराध्यक्ष – विकास आघाडी (१)
नगरसेवक – विकास आघाडी (१३)
नगरसेवक – राष्ट्रवादी (१४)
अपक्ष – (१)
प्रभागवाढ आणि मतदारसंख्या :
या निवडणुकीत एका प्रभागाची वाढ होऊन एकूण १५ प्रभागांमधून ३० नगरसेवक निवडले जाणार आहेत. एकूण ६४,२१५ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील.
प्रभाग क्र. १५ हा सर्वाधिक ५,५९५ मतदारांसह अव्वल आहे, तर प्रभाग क्र. ११ हा केवळ २,७४५ मतदारसंख्येसह सर्वात लहान आहे.
ईश्वरपूरचे राजकारण पुन्हा एकदा रंगणार असून, प्रत्येक पक्ष, गट आणि संघटना स्वतःचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.




