सांगली |
सांगली शहरात मंगळवारच्या मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. दलीत महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष आणि राजकीय पदाधिकारी उत्तम जिनाप्पा मोहिते (वय ४१, रा. गारपीर चौक) यांची त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यानच स्टेजवर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या ‘मुळशी पॅटर्न’ शैलीतील खुनाने सांगली हादरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सुमारास उत्तम मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त गारपीर चौकात भव्य स्टेज उभारण्यात आले होते. रात्री उशिरा वातावरण जल्लोषात रंगले असतानाच, संशयित शाहरुख शेख हा काही साथीदारांसह कार्यक्रमस्थळी आला. त्याने जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर “शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने” मोहिते यांच्याजवळ जाऊन पोटात आणि मानेवर धारदार हत्याराने वार केले.
क्षणार्धात गोंधळ उडाला, आणि मोहिते गंभीर जखमी अवस्थेत कोसळले. तत्काळ त्यांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, हल्ल्यानंतर संतप्त जमावाने आरोपी शाहरुख शेख याला पकडून बेदम मारहाण केली. तो सुद्धा गंभीर जखमी असून त्याच्यावर सध्या शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर सांगली शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि मोठा फौजफाटा रुग्णालय तसेच घटनास्थळी दाखल झाला.
मोहिते हे हटके आंदोलनांसाठी प्रसिद्ध राजकीय कार्यकर्ते होते. त्यांनी सांगली जिल्ह्यात विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर अनेक आंदोलने केली होती.
घटनेमुळे सांगलीत भीती, संताप आणि चर्चेची लाट उसळली असून समाजमाध्यमांवर या खुनाबद्दल मोठी चर्चा सुरू आहे. मध्यरात्रीपर्यंत शहर पोलिस ठाण्यात कोणताही अधिकृत गुन्हा नोंदवला गेला नव्हता.




