जत : नगरपरिषदेच्या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर जत शहरात तब्बल सहा देशी पिस्टल व २० जिवंत काडतुसे हस्तगत झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जत पोलिसांनी विजेच्या वेगाने धडक कारवाई करत मारुती ऊर्फ बबलू श्रीमंत गलांडे (३०, रा. विठ्ठलनगर, जत) आणि आकाश सुरेश हजारे (२७, रा. घुट्टेवाडी, बारामती) या दोघांना गजाआड केले.
पोलिसांनी पिस्टल, काडतुसे, मोटारसायकल व मोबाइल असा एकूण ३ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, शहरात अवैध शस्त्रविक्रीचे जाळे सक्रिय झाले का? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
📌 गुप्त माहिती… पेट्रोल पंपाजवळ सापळा… आणि अचूक कारवाई!
दि. ८ नोव्हेंबर रोजी पोलीस कॉन्स्टेबल सुभाष काळेल यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एकजण अवैध देशी पिस्टलची विक्री करण्यासाठी विजयपूर रोडवरील एच.पी. पेट्रोल पंपाजवळ येणार आहे.
त्यावर पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. व्ही.व्ही. पोटे, अच्युतराव माने, सचिन शिंदे, विक्रम घोदे, नाथा खोत, सागर करांडे व सुभाष काळेल यांनी सापळा रचला.
या वेळी मारुती गलांडे संशयास्पदरीत्या फिरताना हाती लागला. झडतीत त्याच्याकडे एक स्टील बॉडीचे देशी पिस्टल आढळून आले.
🔍 जतमधील घरातून आणखी पिस्टल… आणि धागा बारामतीकडे!
अटकेत घेतल्यानंतर गलांडेनं घरातून आणखी
▪ २ पिस्टल
▪ ८ राउंड
काढून दिली.
पुढील तपासात त्याने तीन पिस्टल बारामती तालुक्यातील घुट्टेवाडी येथील मित्र आकाश हजारे याच्याकडे ठेवल्याची कबुली दिली.
बारामतीत कारवाई करत पोलिसांनी
▪ ३ पिस्टल
▪ १२ जिवंत काडतुसे
जप्त केली.
🕵️ तपासाची दिशा — जतमध्ये कोणा-कोणाकडे पोहोचली पिस्टल?
या आरोपींकडून जतमध्ये कोणाला पिस्टल विकली?
अजून कुठे शस्त्रसाठा आहे का?
हे सर्व तपासण्यासाठी जत पोलिसांनी चौकशी अधिक गतीने सुरू केली आहे.
प्राथमिक तपास पो.उ.नि. व्ही.व्ही. पोटे यांनी तर पुढील तपास पो.उ.नि. प्रशांत चव्हाण करीत आहेत.
🚨 जतमधील आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई!
उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी माहिती मिळविणाऱ्या पो.कॉ. सुभाष काळेल यांचे आणि संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले.
जत शहरात एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर पिस्टल-काडतुसे मिळाल्याची ही पहिलीच घटना आहे.




