जत/राजकीय
भाजपने विधानसभा निवडणुकीत मतदारांना दिलेल्या ‘एकावर एक फ्री आमदार’ ऑफरचं नेमकं काय झालं? — हा सवाल आता जत तालुक्यात जोरात घुमू लागला आहे. निवडणुकीत भाजपला मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून देणाऱ्या जतकरांचा हा थेट पक्ष नेतृत्वाला सवाल आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपचे उमेदवार व विधानपरिषदेचे आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारावेळी पक्षाने तालुक्यातील मतदारांना ही आगळीवेगळी ऑफर दिली होती.
“पडळकरांना आमदार करा, आणि जत तालुक्याला आणखी एक आमदार फ्री!”
अशी घोषणा ठिकठिकाणी करण्यात आली. मतदारांनीही ही ऑफर स्वीकारत पडळकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले.
या प्रचारात केंद्रीय सिमेंट कॉर्पोरेशनचे संचालक व सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रविंद्र आरळी यांच्यासह अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जबरदस्त मेहनत घेतली होती. विशेष म्हणजे डॉ. आरळी हे या प्रचार मोहिमेचे अग्रभागी नेतृत्व करीत होते.
मतदारांनी गृहीत धरले होते की —
‘एकावर एक आमदार’ ऑफरमध्ये डॉ. आरळींचीच विधानसभा उमेदवारी पक्की!’
परंतु ‘राजकीय अंकगणित’ अचानक बदलले.
डॉ. आरळी यांना अपेक्षित विधानसभा उमेदवारी न मिळता
उलट ते नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा भाजपने केली.
तेही — डॉ. आरळी स्वतः तयार नसताना — अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या वेगाने फिरू लागली आहे.
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता जनता आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा प्रश्न घुमू लागला आहे—
“एकावर एक फ्री आमदाराची ऑफर कुठे हरवली?”
यामुळे जत तालुक्यातील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.




