पलूस : “अडथळे कितीही आले तरी विजय आमचाच ठरणार. पलूसचा चेहरा–मोहरा बदलणे अत्यावश्यक असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीला पलूस नगरपरिषदेची सत्ता मिळाल्यास पलूसचा सर्वांगीण कायापालट करून दाखवू,” असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीच्या जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते. महिलांसह नागरिकांची मोठी उपस्थिती या सभेचे आकर्षण ठरली.
खासदार तटकरे म्हणाले की, पलूस शहराचा प्रारूप विकास आराखडा सरकारकडे असून त्यावर सकारात्मक पावले लवकरच उचलली जातील. “उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून विकासासाठी भरपूर निधी मिळणार असून उच्चशिक्षित उमेदवारांची आमची टीम पलूसचा कायापालट करण्यास सक्षम आहे,” असे त्यांनी नमूद केले.
लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना तटकरे म्हणाले, “महाराष्ट्र कर्जबाजारी होईल असा बेताल आरोप करणाऱ्यांनी आकडेवारी पाहावी. अडीच कोटी महिलांना स्वावलंबी बनविण्याचे ऐतिहासिक कार्य अजितदादांनी केले आहे.”
युवा नेते निलेश येसुगडे म्हणाले की, पलूसच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व रखडलेल्या कामांची यादी खासदार तटकरे यांच्याकडे दिली असून “स्वप्नातील पलूस उभा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी सांगितले.
सभेपूर्वी तुतारी आणि हलगीच्या गजरात खासदार तटकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जोत्स्ना विठ्ठलराव येसुगडे, जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा पाटील, उपाध्यक्ष हणमंत कदम, जिल्हा निरीक्षक लतीफ तांबोळी, तालुका अध्यक्ष सारंग माने यांनी धोंडीराज महाराजांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून सत्कार केला.
सभेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपट अण्णा मोरे, शिवसेना शिंदे गटाचे प्रशांत लेंगरे, प्रदीप कदम, दिगंबर पाटील, सोहेल घोरपडे, विजय पाटील, संदीप ठोंबरे, अमीर पठाण, अरुण ब्रम्हे आदी मान्यवर उपस्थित होते. अनेक वक्त्यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर टीका करत, पलूसच्या विकासासाठी महायुतीच सक्षम पर्याय असल्याचा दावा केला.




