तासगाव येथील शिवार तपपूर्ती कृषी महोत्सव १८ ते २२ डिसेंबर दरम्यान दत्त मंदिर मैदानावर भव्य दिमाखात आयोजित करण्यात आला आहे. गेली सलग बारा वर्षे अखंड सुरू असलेल्या या कृषी प्रदर्शनाचा यंदा तपपूर्ती वर्ष असल्याने महोत्सव अधिक विस्ताराने आणि आकर्षक पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. कोरोना काळातही न खंडता झालेल्या या उपक्रमाला शेतकरी वर्गाचा मोठा प्रतिसाद लाभला असून यावर्षी दोन लाखांहून अधिक शेतकरी भेट देतील, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
शेती क्षेत्रातील सर्व घटकांना सामावून घेत द्राक्ष, ऊस, डाळिंब, आंबा, दूध, भाजीपाला, कुक्कुटपालन अशा विविध क्षेत्रातील उत्कृष्ट शेतकऱ्यांना विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत. महिलांसाठी खेळ–पैठणी, हास्यजत्रा, जादूचे प्रयोग, रेकॉर्ड डान्स व संगीत मैफिली असे पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
दरवर्षीप्रमाणे डॉग शो आणि पशुप्रदर्शनही होणार असून आकर्षक बक्षिसांची सोय करण्यात आली आहे. कंपन्या, संस्था आणि व्यावसायिकांना स्टॉलद्वारे सहभागी होण्याचे आवाहन आयोजक महेश खराडे यांनी केले आहे. तसेच उत्कृष्ट उत्पादक शेतकऱ्यांची नावे पुरस्कारासाठी सुचवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.




