गव्हर्मेंट कॉलनी–विजय कॉलनी परिसरातील नागरिकांची चार वर्षांपासूनची पाणीपुरवठ्याची समस्या अखेर मार्गी लागली आहे. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत उभारण्यात आलेल्या १५ लाख लिटर क्षमतेच्या अत्याधुनिक उंच जलकुंभाचे लोकार्पण गुरुवारी आमदार सुधीर गाडगीळ व आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते पार पडले.
१५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून ₹१ कोटी ९९ लाख ७५ हजार ८०० रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या जलकुंभामुळे परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला नवसंजीवनी मिळणार आहे. उंच जलकुंभ कार्यान्वित झाल्यानंतर गव्हर्मेंट कॉलनी, विजय कॉलनी, गजराज कॉलनी, हसणी आश्रम परिसर, कुंभार मळा या भागांना उच्च दाबाने व नियमित पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे.
पूर्वी काही वस्त्यांमध्ये एमआयडीसीचे पाणी घेतल्यामुळे महापालिकेवर अतिरिक्त भार येत होता. नव्या जलकुंभामुळे हा खर्च पूर्णपणे बंद होणार असून महापालिकेला लक्षणीय आर्थिक बचत होणार आहे. हे काम मे. ए. ई. इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि., ठाणे यांनी मानकांचे तंतोतंत पालन करून, नियोजित वेळेत आणि उत्तम तांत्रिक गुणवत्तेसह पूर्ण केले.
लोकार्पणावेळी आमदार गाडगीळ म्हणाले, “विस्तारित भागांतील पाणीपुरवठा समस्येचे हे एक चिरंतन समाधान आहे. रस्ते, ड्रेनेज, पथदिवे आणि पिण्याचे पाणी यांसाठी आवश्यक निधी शासनातून मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करू. याच धर्तीवर शामनगर पाणीपुरवठा योजना देखील लवकरच मार्गी लावली जाईल.”
आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले की, पुढील ३ ते ४ महिन्यांत अंडरग्राउंड ड्रेनेज प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. तसेच परिसरातील रस्ते, गटारे आणि पाणीपुरवठा सुविधा टप्प्याटप्प्याने सुधारल्या जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला माजी मनपा सदस्य, लोकप्रतिनिधी तसेच विनायक सिंहासने, संजय कुलकर्णी, युवराज गायकवाड, सविता मदने, अप्सरा वायदंडे, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, कार्यकारी अभियंते चिदानंद कुरणे, विनायक जाधव, सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे, मुख्य अग्निशमन अधिकारी सुनिल माळी, विशेष कार्यकारी अधिकारी सुनिल पाटील, अधीक्षक रविंद्र चौगुले, अभियांत्रिकी विभागातील अधिकारी–कर्मचारी उपस्थित होते.
दिपक चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी केले.




