नानीबाई चिखलीतील पाटील कुटुंबाला ‘गोपाळरत्न’ पुरस्कार
जिल्ह्यातील नानीबाई चिखली या गावातील पाटील कुटुंबाने पारंपरिक पशुपालनाला आधुनिक विज्ञानाची जोड देत दुग्धव्यवसायात उल्लेखनीय यश मिळवले आहे. मुक्त गोठा पद्धती, यांत्रिक दूध काढणी, जातीवंत मुर्रा म्हणी व गिर गाईंचे संगोपन आणि शास्त्रीय गोठा व्यवस्थापन यांच्या आधारावर दररोज तब्बल 550 लिटर दूध उत्पादन करून पाटील कुटुंबाने राष्ट्रीय पातळीवर नाव कमावले आहे. या कष्टांचा आणि आधुनिकतेच्या अवलंबाचा सन्मान म्हणून केंद्रीय पशुसंवर्धन विभागाने ‘राष्ट्रीय गोपाळरत्न’ पुरस्कार जाहीर केला आहे.
अरविंद पाटील यांनी 1998 मध्ये शिक्षणानंतर नोकरीचा विचार सोडून दुग्ध व्यवसायाला नवी दिशा देण्याचा संकल्प केला. दोन मुर्रा म्हशींपासून सुरुवात करत आज ते सुमारे 150 जनावरांचा आधुनिक मुक्त गोठा चालवतात. दूध हा नाशवंत पदार्थ असल्याने त्यांनी अत्याधुनिक दुग्धसंकलन प्रणाली उभारत 92 टक्के दूध मिल्किंग मशीनद्वारे संकलित केले जाते. शीतकरण केंद्राशी त्वरित जोडलेली व्यवस्था असल्याने दूध शुद्ध आणि दर्जेदार राहते.
पाटील कुटुंबाने पशुखाद्याची व्यवस्था स्वतःच्या शेतीत केली असून 10 एकर शेती पशुधनासाठी राखीव ठेवली आहे. त्यांचे वडील यशवंत पाटील हे संपूर्ण खाद्य व्यवस्थापन पाहतात. मुक्त गोठा पद्धतीनुसार जनावरांना रोज सहा ते सात तास नैसर्गिक संचार मिळतो. विस्तृत, हवेशीर आणि स्वयंचलित पाण्याच्या सोयी असलेला गोठा जनावरांच्या आरोग्यास उपयुक्त ठरतो.
आरोग्य व्यवस्थापनावर भर देत पाटील कुटुंब दर 10 दिवसांनी विशेषज्ञांकडून 150 जनावरांची तपासणी करून घेतात. मुर्रा जातीत सुधारणा करण्यासाठी ते नियमित तज्ञांचे मार्गदर्शन घेतात. एक म्हैस 20–25 लिटर दूध देण्यासाठी आवश्यक असलेली काळजी योजनाबद्ध पद्धतीने घेतली जाते.
गेल्या 30 वर्षांत पाटील यांनी साडेतीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन दुग्धव्यवसायाविषयीचा दृष्टिकोन बदलण्याची गरज अधोरेखित केली आहे. “दोन जनावरांवर आधारित पारंपरिक विचार बदलून किमान पाच जनावरांचा संच असावा,” असे ते शेतकऱ्यांना सुचवतात.
अरविंद पाटील यांच्या प्रयत्नांतून मुक्त गोठा, जातीवंत पैदास, तंत्रज्ञानाचा वापर आणि समूह कुटुंब व्यवस्था यांचे आदर्श मॉडेल निर्माण झाले आहे. पुढेही ते मुर्रा म्हशींच्या दर्जेदार पैदाशीसाठी काम सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.




