महाराष्ट्रातील सर्वात जुन्या नागरी संस्थांपैकी एक असलेल्या आष्टा नगरपरिषदेचा १७२ वा वर्धापन दिन उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. ६ डिसेंबर १८५३ रोजी स्थापन झालेली ही नगरपालिका मुंबईनंतर राज्यातील दुसरी सर्वात जुनी संस्था म्हणून आजही ऐतिहासिक वैभव, सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक विकासाचा संगम जपून आहे.
इतिहासातून आधुनिकतेकडे ‘स्मार्ट आष्टा’
आष्टा शहरात पारंपरिक घरकुले, आधुनिकीकरण केलेले भाजीमार्केट-फिशमार्केट, आष्टलीगसह विविध देवस्थाने, स्वच्छ पाणीपुरवठा योजना, पाण्याच्या टाक्या, अद्ययावत रस्ते-गटारी, फिल्टर हाऊस, शहरशोभी कमानी, समाजमंदिरे तसेच शॉपिंग गाळे अशा अनेक नागरी सुविधा उपलब्ध करून देत शहराने सातत्याने प्रगती साधली आहे. भावई उत्सवासारखा सांस्कृतिक वारसा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून आजही टिकून आहे.
वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम
या ऐतिहासिक दिवसानिमित्त वैभवदादा शिंदे युवा मंचतर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शिक्षणाची प्रेरणा देणे आणि विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याची साधने उपलब्ध करून देणे हा उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
“मोबाईल नव्हे, पुस्तकं असावीत खरी सोबत” — वैभवदादा शिंदे
विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना वैभवदादा शिंदे म्हणाले,“विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन आई-वडिलांचे व आष्टा शहराचे नाव उज्वल करावे. मोबाईलच्या आकर्षणापेक्षा पुस्तके आणि ज्ञान हेच खरे मित्र आहेत.”




