दिव्यांगांसाठी AI–रोबोटिक्स: स्वावलंबनाची नवी दिशा

0
3

सांगली : दिव्यांग मुलांमध्ये उपजत क्षमता असून त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण दिल्यास ते समाजासाठी सकारात्मक आणि मोठा बदल घडवू शकतात. रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे प्रशिक्षण केवळ कौशल्य विकास नसून दिव्यांगांना स्वावलंबी जीवनाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.

मिरज येथील कै. रा. वि. भिडे मूकबधीर शाळेत Applus Idiada व Worship Earth Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष पुढाकाराने आयोजित AI–रोबोटिक्स प्रशिक्षण कार्यशाळेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, सचिव सुरेश आवटी, निरंजन आवटी, फाउंडेशनचे संचालक दिनेश कदम तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, दिव्यांग विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाबरोबर समाजाचेही एकत्रित योगदान अत्यावश्यक आहे. या विद्यार्थ्यांमध्ये दडलेली कौशल्ये ओळखून त्यांचा विकास केला तर ते स्वतःच्या पायावर उभे राहून महिन्याला 40 ते 50 हजारांचे उत्पन्न मिळवू शकतील, अशा उद्दिष्टाने जिल्हा प्रशासन काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यशाळेच्या दुसऱ्या टप्प्यात 40 कर्णबधीर विद्यार्थ्यांना वायरलेस ड्रोन तयार करणे, त्याचे उड्डाण आणि विविध क्षेत्रांतील त्याचा उपयोग याचे सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे. भिडे मूकबधीर शाळेच्या पुढाकाराचे कौतुक करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी संचालक दिनेश कदम यांनी या प्रशिक्षणाचा राष्ट्रीय स्तरावर प्रसार करून शाळेचा दर्जा उंचावण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे सचिव सुरेश आवटी यांनी केले तर आभार निरंजन आवटी यांनी मानले. दिव्यांग शिक्षण क्षेत्रासाठी हा उपक्रम परिवर्तनकारी टप्पा ठरेल, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here