जत विधानसभा मतदारसंघात प्रशासनातील सुलभता, न्याय आणि जनसेवा यांना प्राधान्य देत महत्त्वपूर्ण पावले उचलली जात असल्याची माहिती विधानसभेचे सदस्य गोपिचंद पडळकर यांनी जाहीर केली आहे. मतदारांनी दिलेल्या विश्वासाला न्याय देण्याचा प्रयत्न करताना विविध प्रलंबित मागण्यांना गती देण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा सदस्य होण्यापूर्वीच, विधानपरिषद सदस्य म्हणून पडळकर यांनी संख अप्पर तहसीलदार कार्यालयातील काही गावांचा उमदी अप्पर तहसीलदार कार्यालयात समावेश करण्याची मागणी केली होती. नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नाला उत्तर म्हणून मार्च 2024 मध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. संख–उमदी भागातील पूर्वीचे विवाद आणि उमदी परिसरातील नागरिकांचा सातत्यपूर्ण आग्रह लक्षात घेऊन उमदी येथे स्वतंत्र अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या स्थापनेला तत्त्वतः मंजुरी देण्यात आली.
नव्याने प्रस्तावित उमदी अप्पर तहसील कार्यालयात २२ गावांचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये—
उमदी, विठ्ठलवाडी, उटगी, लमाण तांडा उटगी, निगडी बुद्रुक, सुसलाद, सोनलगी, बोर्गी खुर्द, अक्कळवाडी, मानिकनाळ, बोर्गी बुद्रुक, बालगाव, हळ्ळी, करजगी, बेळोंडगी, जाडर, बोबलाद, सोन्याळ, लकडेवाडी, गिरगाव, लवंगा, गुलगुंजनाळ आणि जालीयाळ बुद्रुक ही गावे येतात.
यासोबतच संख अप्पर तहसीलदार कार्यालयाचा कार्यक्षेत्रही निश्चित करण्यात आले असून एकूण 29 गावांचा समावेश करण्यात आला आहे.
त्यामध्ये संख, गोंधळेवाडी, खंडनाळ, दरीबडची, लमाणतांडा दरीबडची, आसंगी तुर्क, कागनरी, मोटेवाडी आसंगी, धुळकरवाडी, अंकलगी, कुलाळवाडी, सिद्धनाथ, जालीयाळ खुर्द, पांढरेवाडी, तीकोंडी, पांडोझरी, पारधेवस्ती, करेवाडी तीकोंडी, कोंतेव बोबलाद, करेवाडी (को. बो.), मोटेवाडी (को. बो.), कोणबगी, मोरबगी, भिवर्गी, माडग्याळ, व्हसपेठ, गुड्डापूर, आसंगी जत आणि तिल्ल्याळ यांचा समावेश आहे.
“माझा स्वभाव कुणावर अन्याय करण्याचा नाही; सर्व घटकांना न्याय देण्यासाठीच ही प्रक्रिया राबवली आहे,” असे पडळकर यांनी नमूद केले.
संखमध्येही विविध शासकीय सुविधा आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून
सरकारी हॉस्पिटल : प्रस्तावित आणि मंजुरीच्या अंतिम टप्प्यात
रेशीम प्रशिक्षण व उद्योग केंद्र : यासाठी वस्त्रउद्योग मंत्र्यांकडे मागणी सादर
राज्य सरकार सतत संख–उमदी भागाच्या विकासासाठी सकारात्मक निर्णय घेत असल्याचे पडळकर यांनी सांगितले.
“जनता हीच माझे केंद्रस्थान आहे. सुविधा, न्याय आणि प्रशासनातील सुलभता हा माझा ध्यास आहे. आपल्या विश्वासातूनच मला ताकद मिळते,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




