सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव येथे राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण ‘अभ्यासाचा भोंगा’ उपक्रमाची जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. गेली तीन वर्षे सातत्याने सुरू असलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक करत, अशा सामाजिक उपक्रमांचा अवलंब इतर गावांनीही करावा, असे आवाहन केले.
अग्रणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या संकल्पनेतील या उपक्रमांतर्गत पहाटे ५ ते ७ आणि सायंकाळी ७ ते ९ या वेळेत भोंगा वाजवून विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा निश्चित कालावधी राखला जातो. या वेळेत टीव्ही व मोबाईल बंद ठेवण्याचे ग्रामस्थ स्वयंशिस्तीने पालन करतात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची नियमितता वाढून गुणवत्तेत सकारात्मक बदल दिसून येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.
कोविड काळात वाढलेल्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी सर्वानुमते हा उपक्रम स्वीकारला. सकाळ-सायंकाळ शांत वातावरणात विद्यार्थी अभ्यास करत असून कुटुंबीयांमधील संवादही वाढल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
पाहणीदरम्यान मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अर्चना कापसे, सरपंच शिवदास भोसले, उपसरपंच भारती चौगुले आदी अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी घरोघरी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनीही व्हिडिओ कॉलद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
गावातील आजी व माजी सैनिक, शिक्षक व ग्रामस्थांच्या सहभागाचे विशेष कौतुक करत जिल्हाधिकाऱ्यांनी हा उपक्रम संपूर्ण जिल्हा व राज्यात विस्तारावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
अग्रण धुळगाव येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी नाविन्यपूर्ण ‘अभ्यासाचा भोंगा’उपक्रमाची पाहणी करून शाळकरी मुलांना कौतुकाची थाप दिली.




