—
महाराष्ट्र वन विभागाच्या ‘ऑपरेशन तारा’ उपक्रमांतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतरित दोन वर्षांची मादी वाघीण T7-S2 हिचे चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सोनारली अनुकूलन कुंपणात सॉफ्ट रिलिज करण्यात आले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघ पुनर्स्थापन मोहिमेतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
ही वाघीण ८ डिसेंबर रोजी ताडोबातील कोलारा कोअर रेंजमध्ये सुरक्षित पकडण्यात आली होती. वन्यजीव पशुवैद्य डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी केलेल्या तपासणीत ती पूर्णतः तंदुरुस्त असल्याचे निष्पन्न झाले. सॉफ्ट रिलिजमुळे वाघीण नव्या परिसरातील भक्ष्यसाठा, भूभाग व वातावरणाशी नियंत्रित पद्धतीने जुळवून घेऊ शकते.
या संपूर्ण प्रक्रियेचे वैज्ञानिक निरीक्षण भारतीय वन्यजीव संस्थेचे डॉ. के. रमेश व आकाश पाटील करीत असून, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण देखील या मोहिमेवर देखरेख ठेवत आहे.
ताडोबा व सह्याद्री प्रकल्पांच्या संयुक्त पथकांनी केलेल्या समन्वयामुळे ही कार्यवाही यशस्वी झाली. या मोहिमेचे नियोजन मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) डॉ. जितेंद्र रामगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
“T7-S2 ही तरुण, सशक्त व स्थलांतरासाठी पूर्णतः योग्य मादी आहे. तिची उपस्थिती सह्याद्रीतील वाघ संवर्धनास बळ देईल.”
डॉ. प्रभुनाथ शुक्ला
IFS, क्षेत्र संचालक TATR
“चांदोलीत सुरक्षित अधिवास व पुरेसा भक्ष्यसाठा उपलब्ध आहे. वाघीणीच्या सातत्यपूर्ण देखरेखीसाठी पथके सज्ज आहेत.”
तुषार चव्हाण
क्षेत्र संचालक, सह्याद्री प्रकल्प
“ताडोबा–सह्याद्री यांचा उत्कृष्ट समन्वय राज्यातील वाघ संवर्धन अधिक मजबूत करतो.”
श्री.एम.श्रीनिवास रेड्डी
IFS, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)




