“सध्याचा काळ अत्यंत भयानक आहे. खऱ्याला दारोदार फिरावे लागत आहे, तर खोटेपणाला समाजात प्रतिष्ठा मिळत आहे

0
14

– हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर

जत :

“सध्याचा काळ अत्यंत भयानक आहे. खऱ्याला दारोदार फिरावे लागत आहे, तर खोटेपणाला समाजात प्रतिष्ठा मिळत आहे. संस्कारांची शिदोरी कमी पडत चालली असून, तरुणाई भरकटण्याचा धोका वाढला आहे. येणाऱ्या काळात परिस्थिती अधिक कठीण होणार आहे. त्यामुळे तरुणांनी वेळीच सावध व्हावे, शेतीसोबत पोट भरण्यासाठी एखादी कला आत्मसात करावी आणि आई-वडिलांना मान खाली घालावी लागेल असे वर्तन कधीही करू नये,” असे कळकळीचे आणि परखड आवाहन निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले.

जत तालुक्यातील येळवी येथे ओंकारस्वरूपा कॉलेजच्या मैदानावर जमदाडे परिवाराच्या वतीने आयोजित भव्य कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते. स्व.हभप विठोबा जमदाडे व लोचनाबाई विठोबा जमदाडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. शिवनेरी कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा दऱ्याप्पा जमदाडे व माजी सरपंच मारुती जमदाडे यांच्या हस्ते इंदुरीकर महाराजांचा सन्मान करण्यात आला.

इंदुरीकर महाराजांनी आपल्या खास, खुमासदार शैलीत समाजातील बदलती मानसिकता, कुटुंबसंस्कारांचे महत्त्व, वाढती व्यसनाधीनता, भ्रष्टाचार आणि अंधश्रद्धा यावर जोरदार प्रहार केला. “आई-वडिलांचे कष्ट, त्याग आणि संस्कार विसरून चालणार नाहीत. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रामाणिक जीवन, कष्टाची तयारी आणि समाजासाठी उपयुक्त ठरणे,” असा संदेश त्यांनी दिला. शेती क्षेत्रात मजुरांची कमतरता, वाढते खर्च आणि बदलती परिस्थिती यावरही त्यांनी स्पष्ट भाष्य करत तरुणांना वास्तवाची जाणीव करून दिली.

यावेळी जमदाडे कुटुंबीयांनी सांगितले की, स्व. हभप विठोबा जमदाडे व लोचनाबाई जमदाडे यांनी प्रतिकूल परिस्थितीतही पंढरपूरची आषाढी-कार्तिकी वारी आयुष्यभर अखंड सुरू ठेवली. कठीण आर्थिक परिस्थिती असूनही त्यांनी नातवंडांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. आज कुटुंबातील एक सदस्य अमेरिकेत उच्च शिक्षण घेत आहे, ही त्यांच्या संस्कारांचीच साक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले. आई-वडिलांच्या स्मृतींना अभिवादन व त्यांच्या ऋणातून उतराई होण्याच्या भावनेतूनच हा कीर्तन सोहळा आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.

या कीर्तन सोहळ्यास आळंदीचे हभप शेटे महाराज, हभप कैलास महाराज, हभप उद्धव माऊली शिंदे यांनी नायक साथ दिली. हभप राजाराम महाराज देवडकर (आळंदी) व हभप नितीन महाराज हारकळ यांनी वादनाची साथ दिली. दिघंची येथील श्री विश्व माऊली अध्यात्मिक केंद्राचे सचिन महाराज कुंभार व त्यांचा ग्रुपही उपस्थित होता. कार्यक्रमाला भाविकांची मोठी गर्दी झाली असून संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने भारावून गेला होता. आभार प्रदर्शन प्रशांत जमदाडे यांनी केले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here