विश्वासराव नाईक कारखान्यास प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार

0
12

येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना यांना मांजरी बु.(पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून सन २०२४–२५ साठी प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारासह इतर मान्यवर पुरस्कारांचे वितरण दि. २९ डिसेंबर रोजी मांजरी बुद्रूक येथे सकाळी ९.३० वाजता होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे संचालक विराज नाईक यांनी दिली. यावेळी कार्यकारी संचालक अमोल पाटील उपस्थित होते.

कारखान्याचे अध्यक्ष मानसिंग नाईक, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील व संचालक मंडळाच्या दूरदृष्टीतून ऊस उत्पादन वाढीसाठी राबविण्यात आलेल्या योजनांमुळे हे यश मिळाल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले. कारखान्याने शेतकऱ्यांना १ रुपयात ऊस रोपे उपलब्ध करून दिली असून, इतर नर्सरीतून घेतलेल्या रोपांवर ५० पैशांचे प्रतिरोप अनुदान जाहीर केले आहे. तसेच व्ही.एस.आय.ची उत्पादने अनुदानासह पुरविण्यात येत आहेत.

पाडेगाव ऊस संशोधन केंद्र व व्ही.एस.आय., पुणे येथून सुधारित बियाणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविणे, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक ऊस शेतीचे प्रशिक्षण, जिवाणू खत व माती परीक्षण प्रयोगशाळा, बायोकंपोस्ट खत निर्मिती, शेतकरी मेळावे व प्रशिक्षण कार्यक्रम यामुळे ऊस उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे.

या सर्व उपक्रमांची दखल घेत व्ही.एस.आय.ने हा मानाचा पुरस्कार जाहीर केला असून, या यशात ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, शेती व ऊस विकास विभाग, अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान असल्याचे श्री. नाईक यांनी नमूद केले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here