ईश्वरपूर पोलिसांमुळे वृद्धाचा जीव वाचला | पोलीस अंमलदार जयवंत पाटील यांची धाडसी कामगिरी

0
22

ईश्वरपूर : ईश्वरपूर येथील पोलीस दलाने मानवतेचे दर्शन घडवणारी प्रेरणादायी घटना समोर आली आहे. ईश्वरपूर पोलीस ठाणे येथील पोलीस अंमलदार जयवंत विठ्ठल पाटील यांनी आपल्या कर्तव्यभावनेतून व धैर्याने एका वृद्धाचा प्राण वाचवला.

दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास, पोलीस अंमलदार जयवंत पाटील हे कर्तव्य संपवून घरी जात असताना ताकारी नदी पुलावर एका इसमाने अचानक नदीत उडी मारल्याची घटना घडली. घटनेमुळे पुलावर मोठी गर्दी जमली होती.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता पाहणी केली असता तो इसम नदीत बुडत असल्याचे निदर्शनास आले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी अंगावरील कपडे काढून तात्काळ नदीत उडी घेतली. यावेळी उपस्थित असलेल्या एका जागरूक नागरिकानेही त्यांच्या सोबत नदीत उडी घेतली.

दोघांनी मिळून पोहत त्या इसमापर्यंत जाऊन त्याला सुरक्षितपणे नदीकाठावर आणले व उपस्थित नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. चौकशीअंती त्या इसमाचे नाव दिपक महादेव पळसे (वय ४९, रा. ईश्वरपूर) असे समजले.

तत्काळ १०८ रुग्णवाहिका बोलावून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, ईश्वरपूर येथे दाखल करण्यात आले.

पोलीस अंमलदार जयवंत विठ्ठल पाटील यांनी दाखवलेली ही धाडसी व कौतुकास्पद कामगिरी अत्यंत प्रेरणादायी असून त्यांच्या साहसी कृतीबद्दल सांगली जिल्हा पोलीस दलासह नागरिकांकडून सर्वत्र कौतुक व्यक्त होत आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here