माहेरच्या नातेवाईकांनी खरेदी करून दिलेले घर आपल्या नावावर करण्यासाठी पतीसह सासू-सासऱ्यांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. घरात घुसून मारहाण, शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असून, याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पूनम गणेश ओमासे (वय ३३, रा.काकानगर, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. २०१५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत पती गणेश ओमासे, सासू शालन ओमासे व सासरे सुरेश ओमासे यांनी सतत छळ करत घर माझ्या नावावर कर, अन्यथा जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.
संजोग कॉलनीत बंगल्यात चोरी; सहा लाखांचा ऐवज लंपास
शहरातील मध्यवर्ती संजोग कॉलनीतील एका बंगल्यात रोख रक्कम व सुमारे चार किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सम्राट विश्वनाथ माने (रा. ईश्वर बंगला, संजोग कॉलनी) यांनी सांगली शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
दि. २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ही चोरी उघडकीस आली. संशयित चोरट्यांनी गेटवरून उडी मारून आवारात प्रवेश करत खिडकीचे गज वाकवून घरात शिरकाव केला. बेडरूममधील कपाटातून ६५ हजार रुपये रोख व चांदीचे दागिने-वस्तू असा सुमारे सहा लाखांचा ऐवज लुटून चोरट्यांनी पलायन केले. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.




