‘
तासगाव तालुक्यातील द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या मेहनतीवर घाला घालणारा मोठा प्रकार अखेर चव्हाट्यावर आला आहे. तासगाव येथील राधिका व बटेजा कोल्ड स्टोरेजवर अफगाणिस्तानातून कमी दरात बेदाणा आयात करून त्यावर प्रक्रिया करत तो 'तासगावचा बेदाणा' म्हणून विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. द्राक्ष बागायतदार संघाने हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या दोन्ही स्टोअरेजवर मोर्चा काढला. यावेळी दोन्ही स्टोअरेज व्यवस्थापनाने आम्ही अफगाणी बेदाणा आणल्याची लेखी कबुली दिली आहे.
यावर्षी नैसर्गिक कारणांमुळे बेदाण्याचे उत्पादन घटले होते. परिणामी, कधी नव्हे तो शेतकऱ्यांच्या बेदाण्याला चांगला दर मिळत होता. अनेक वर्षांनंतर बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. मात्र, हा आनंद काही व्यापाऱ्यांना बघवला नाही. शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फेरण्यासाठी अफगाणिस्तानातून बेदाणा आयात करून स्थानिक बाजारपेठेत त्याची विक्री करण्यात आली. हा प्रकार म्हणजे थेट बळीराजाच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखाच असल्याची भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
तासगावच्या शेतकऱ्यांनी हाडाची काडे आणि रक्ताचे पाणी करून द्राक्ष शेती फुलवली आहे. दुष्काळ, रोगराई, खर्चाची वाढ यांचा सामना करत त्यांनी बेदाण्याची दर्जेदार निर्मिती केली. दरवर्षी दर कोसळतात, नुकसान पदरात पडते; मात्र यावर्षी मिळालेला चांगला भाव व्यापाऱ्यांच्या डोळ्यात खुपला. त्यातूनच राधिका व बटेजा कोल्ड स्टोरेजवरील व्यापाऱ्यांनी अफगाणी बेदाणा मोठ्या प्रमाणावर खरेदी करून तो स्थानिक बेदाण्यात मिसळण्याचा उद्योग सुरू केला.
हा प्रकार द्राक्ष बागायतदार संघाच्या निदर्शनास येताच त्यांनी अफगाणी बेदाण्याची तस्करी उघडकीस आणली. त्यानंतर तासगाव बाजार समितीत व्यापारी व शेतकरी प्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीत प्रचंड वाद झाला. शेतकऱ्यांशी गद्दारी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. मात्र, बाजार समितीने केवळ जुजबी कारवाई करत वेळकाढूपणा केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
बाजार समितीच्या तकलादू कारवाईमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश कराडे यांच्या नेतृत्वाखाली आज राधिका व बटेजा कोल्ड स्टोरेजवर जोरदार मोर्चा काढण्यात आला. मोर्चा धडकताच व्यापाऱ्यांची पळापळ उडाली. शेतकऱ्यांच्या रोषापुढे अखेर दोन्ही कोल्ड स्टोरेजनी नांगी टाकली.
मोर्चावेळी दोन्ही कोल्ड स्टोरेज व्यवस्थापनाने 'आम्ही अफगाणिस्तानचा बेदाणा आणला होता, आमची चूक झाली' अशी लेखी कबुली दिली. यापुढे अफगाणी बेदाणा खरेदी करणार नाही, तसेच कोणत्याही व्यापाऱ्याला अशा व्यवहारासाठी मदत करणार नाही, असा माफीनामा त्यांनी दिला आहे. या लेखी कबुलीमुळे तासगावात अफगाणी बेदाण्याची तस्करी झाल्याचे निर्विवादपणे सिद्ध झाले आहे.
या प्रकरणी आता केवळ माफीनामा पुरेसा नसून, अन्न व औषध प्रशासन व भेसळ प्रतिबंधक विभागाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन तहसीलदार अतुल पाटोळे यांना देण्यात आले आहे. आता बाजार समिती व बेदाणा व्यापारी असोसिएशन या दोषी स्टोरेजवर नेमकी काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण बेदाणा उत्पादक शेतकरी वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे.




