संदीप गिड्डे यांची भाजपमधून हकालपट्टी | जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांची माहिती : पक्षविरोधी कारवायांमुळे दणका

0
11

       

भारतीय जनता पार्टीच्या शिस्तीला आणि संघटनात्मक निर्णयांना खुलेआम आव्हान देणाऱ्या संदीप गिड्डे-पाटील यांना अखेर भाजपने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. भाजप किसान मोर्चाचे माजी प्रदेश सरचिटणीस असलेल्या गिड्डे-पाटील यांची पक्षशिस्तभंग व उघड पक्षविरोधी कारवायांमुळे तात्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांचे प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदे रद्द करण्यात आली आहेत. पक्षाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

       

महाडिक म्हणाले, गिड्डे-पाटील हे मूळचे कवठेमहांकाळ तालुक्यातील नागोळे गावचे आहेत. त्यांचा तासगाव तालुक्याशी कोणताही अधिकृत संबंध नाही.तरीही त्यांनी तासगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत जाणीवपूर्वक हस्तक्षेप करून भाजपचे नुकसान केले आहे.भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात वातावरण तयार करणे, अंतर्गत गटबाजीला खतपाणी घालणे आणि विरोधकांना अप्रत्यक्ष बळ देणे, अशा कारवायांमुळे पक्षात तीव्र नाराजी निर्माण झाली होती.

     

या पार्श्वभूमीवर कवठेमहांकाळ तालुका मंडल अध्यक्ष उदयराजे भोसले, तासगाव ग्रामीण मंडल अध्यक्ष स्वप्निल पाटील आणि तासगाव नगरपालिकेचे प्रभारी अनिल लोंढे यांनी गिड्डे-पाटील यांच्याविरोधात लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारी थेट प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. चौकशीअंती गिड्डे-पाटील यांचे कृत्य हे सरळसरळ पक्षद्रोहाचे असल्याचा निष्कर्ष निघाल्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाईचा आदेश देण्यात आला.

       

ते म्हणाले, तासगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या अधिकृत भूमिकेला धाब्यावर बसवत गिड्डे-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही व्यक्तींना प्रवृत्त केले. इतकेच नव्हे तर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यास सांगितल्याचा खोटा व दिशाभूल करणारा प्रचार करून जनतेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.

       

महाडिक म्हणाले, याशिवाय कोणालाही विश्वासात न घेता विरोधी नेत्यांशी ‘सेटलमेंट’च्या उद्देशाने चर्चा करून त्यावर पत्रकार परिषद घेण्यात आली. भाजपचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभेमध्ये दाखवलेल्या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाच्या व्हिडिओबाबतही गिड्डे-पाटील यांनी तो एआयच्या माध्यमातून तयार केल्याचा खोटा आरोप करत पुन्हा एकदा जनतेची दिशाभूल केली.

     

सुरुवातीला काही उमेदवारांना आमिषे दाखवून भाकपचे पॅनेल उभे राहू नये यासाठी प्रयत्न करणे. निवडणूक निकालानंतर पत्रकार परिषद घेऊन भाजपची बदनामी करणे, अशा एकापाठोपाठ एक कृत्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या संयमाचा बांध तुटला.

     

याआधीही ‘भाजपमध्ये पक्षप्रवेशासाठी पैसे घेतले जातात’ अशी बेजबाबदार आणि खोटी विधाने गिड्डे-पाटील यांनी केली होती. कवठेमहांकाळ तालुक्यातील अनिता सगरे यांचा पक्षप्रवेश १० कोटी रुपये घेऊन होणार असल्याचा खोटा प्रचार पत्रकार परिषद घेऊन करण्यात आला होता. या सर्व प्रकारांची गंभीर दखल घेत भाजपने गिड्डे यांची हकालपट्टी केली आहे. पक्षशिस्तीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here