महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत शहराच्या राजकारणात राजकीय वारसदारांची मोठी उतरंड पाहायला मिळत आहे. विविध प्रभागांत दिग्गज नेत्यांची मुले, पुतणे, सुना थेट निवडणूक रिंगणात उतरली असून, त्यांच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी ‘बापमाणसांनी’ स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. भावी पिढीची राजकीय वाटचाल भक्कम करण्यासाठी हे ज्येष्ठ नेते दिवस-रात्र प्रचारात झोकून देताना दिसत आहेत. कुठे पदयात्रा, कुठे बैठका, तर कुठे थेट मतदारांच्या दारात जाऊन गाठीभेटी घेतल्या जात असून, पक्षाची यंत्रणा, कार्यकर्ते आणि समर्थकांना सोबत घेऊन ज्येष्ठ नेते स्वतः मैदानात उतरल्याने प्रचाराला वेगळीच धार आली आहे. काही प्रभागांत तर ‘उमेदवार नव्हे, बापमाणूसच लढतोय’ अशी चर्चा रंगू लागली आहे.
महापालिकेची ही सहावी निवडणूक असून, या कालावधीत अनेक नेत्यांनी महापालिकेच्या राजकारणात दुसरी पिढी पुढे आणली आहे. कुणी मुलगा-मुलगी यांना संधी दिली आहे, तर कुणी पुतण्यावर विश्वास टाकत राजकीय वारसांची धुरा दिली आहे. यंदाच्या निवडणुकीतही डझनभर ‘बापमाणूस’ भावी पिढीच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. राजकारणातील अनुभव, संपर्क आणि प्रभाव यांचा पुरेपूर वापर करून पुढील पिढीला स्थिरावण्याचा हा प्रयत्न असला, तरी यामुळे घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नवख्या पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी ही स्पर्धा अधिक कठीण बनल्याची चर्चा शहरात सुरू असून, महापालिकेच्या या निवडणुकीत बापमाणसांच्या ताकदीवर कोणाची राजकीय वारसदारी सिद्ध होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याच पार्श्वभूमीवर अनेक ज्येष्ठ नेते प्रचारात आघाडीवर दिसत आहेत. खासदार विशाल पाटील यांनी पुतण्या हर्षवर्धन याला उमेदवारी दिली असून, त्याच्यासाठी खा. पाटील यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील प्रयत्नशील आहेत. स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश आवटी यांचे चिरंजीव संदीप व निरंजन पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले असून, गत निवडणुकीत दोघेही विजयी झाले होते. यंदाही त्यांच्या विजयासाठी आवटी सक्रिय आहेत. माजी महापौर किशोर जामदार यांचे पुत्र करण जामदार यंदाही निवडणूक लढवीत असून, त्यांच्यासाठी किशोर जामदार यांनी मोर्चेबांधणी केली आहे. तसेच स्थायी समितीचे माजी सभापती दिलीप सूर्यवंशी यांचे पुतणे धीरज व चेतन हे वेगवेगळ्या प्रभागांतून निवडणूक लढवीत असून, त्यांना निवडून आणण्यासाठी सूर्यवंशी यांनी पूर्ण ताकद लावली आहे.
याशिवाय प्रचारासाठी झटणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये विशाल पाटील (पुतण्या), इद्रीस नायकवडी (मुलगा), दिनकर पाटील (सून), किशोर जामदार (मुलगा), संगीता खोत (पुतण्या), सुरेश आवटी (दोन मुले), दिलीप सूर्यवंशी (दोन पुतणे), बटूदादा बावडेकर (मुलगा), धनपाल खोत (सून), किरण सूर्यवंशी (सून), मोहन व्हनखंडे (मुलगा), सचिन कदम (सून), हारुण खतीब (मुलगा) आणि रज्जाक नाईक (बहीण) यांचा समावेश आहे.




