आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यात राजकीय समीकरणांना निर्णायक कलाटणी देणारी घोषणा आज करण्यात आली. भाजपविरोधात काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट, शिवसेना (उबाठा) व राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) एकत्र येत निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली. या महाआघाडीच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेला सक्षम, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख पर्याय देण्याचा निर्धार नेत्यांनी व्यक्त केला.
या संयुक्त पत्रकार परिषदेला अजितदादा राष्ट्रवादी गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा माजी आमदार विलासराव जगताप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विक्रमसिंह सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे तालुकाध्यक्ष मन्सूर खतीब, रासपचे राज्य युवा नेते अजित पाटील तसेच शिवसेना (उबाठा)चे नेते अमित दुधाळ उपस्थित होते. सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सखोल चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
भाजपच्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून, शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, पाणीपुरवठ्याची समस्या, स्थानिक स्वराज्य संस्थांचे दुर्बलीकरण आणि समाजात पसरवण्यात आलेली जातीय तेढ या मुद्द्यांवर भाजप अपयशी ठरल्याचा आरोप महाआघाडीच्या नेत्यांनी केला. “भाजपाने विकासाच्या नावाखाली केवळ कायदोपत्री घोषणांचा पाऊस पाडला आहे. प्रत्यक्षात शेतकरी, कष्टकरी व ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न आजही जैसे थे आहेत,” असे मत विलासराव जगताप व विक्रमसिंह सावंत यांनी मांडले.
तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद गट व १८ पंचायत समिती गणांमध्ये परस्पर समन्वय राखत ही महाआघाडी निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात आले. येत्या दोन दिवसांत जागावाटप, उमेदवारांची अंतिम यादी तसेच निवडणूक चिन्हाबाबत निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहितीही देण्यात आली. “एकत्रित ताकदीने, एकाच विचारधारेतून आणि एकाच उमेदवारामागे उभे राहून भाजपला सडेतोड उत्तर दिले जाईल,” असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी (श. प.) गटाचे युवक जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे, राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे नेते तम्मनगौडा रवी पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांच्यासह ज्येष्ठ नेते आप्पाराया बिराजदार, राम सरगर, रमेश पाटील, बाबासाहेब कोडग, प्रमोद सावंत, युवराज निकम, अण्णासाहेब कोडग, संग्राम जगताप, किसन टेंगले, राजू डफळे, आनंदा पाटील, विश्वास भोसले, सज्जन चव्हाण आदी विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या बैठकीला माजी सभापती सुरेश शिंदे अनुपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. याबाबत खुलासा करताना विलासराव जगताप यांनी, “सुरेश शिंदे वैयक्तिक कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, तेही लवकरच आमच्या सोबत येतील,” असे स्पष्ट केले.
एकंदरित, जत तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या भाजप विरुद्ध महाआघाडी अशा थेट लढतीत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले असून, या घोषणेमुळे तालुक्यातील राजकारणात नव्या चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
जत तालुक्यात भाजपाविरोधी झालेल्या महाआघाडीच्या पत्रकार परिषदेवेळी सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी




