जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी राजकीय मोर्चेबांधणीला वेग
जत : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजताच जत तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद गट व अठरा पंचायत समिती गणांसाठी इच्छुक, पक्ष व आघाड्यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत एकाकी मोठा विजय संपादन करत भारतीय जनता पार्टीचा आत्मविश्वास द्विगुणित झाला असून, यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या संभाव्य आघाडीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची भूमिका अद्याप स्पष्ट नसल्याने ते स्वतंत्र लढणार की आघाडी अथवा युतीशी हातमिळवणी करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसेच शिवसेना (शिंदे गट), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बहुजन समाज पार्टी व राष्ट्रीय समाज पक्ष या पक्षांची भूमिका अनेक गटांत निकालावर परिणाम करणारी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गत निवडणुकीत पंचायत समितीत विलासराव जगताप गटाचे (तत्कालीन भाजप) ८, काँग्रेसचे विक्रम सावंत गटाचे ८, सुरेश शिंदे यांच्या विकास आघाडीचे १ व जनसुराज्य पक्षाचे १ असे बलाबल होते. त्यावेळी विलासराव जगताप यांनी जनसुराज्य व आघाडीला सोबत घेत पंचायत समितीवर सत्ता मिळवली होती. नऊ जिल्हा परिषद गटांमध्येही विलासराव जगताप यांना ६, तर काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत यांना ३ जागांवर यश मिळाले होते.
यंदा मात्र जतच्या राजकारणात लक्षणीय बदल झाले आहेत. भाजपने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेसह नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत एकाकी बहुमत मिळवत काँग्रेस व दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. सुरुवातीला काँग्रेसकडे झुकलेला कल निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भाजपने बदलत नगरपरिषदेवर वर्चस्व प्रस्थापित केले. याचा काही अंशी ग्रामीण राजकारणावरही परिणाम जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र आगामी निवडणुकीत बंडखोरी, अपक्षांची भूमिका व लहान पक्षांमधील मतविभाजन हे घटक निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषद गटात चुरशीची व लक्षवेधी लढत पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. गावोगावी बैठका सुरू असून, प्रमुख पक्षांसह आघाड्या, युती व स्थानिक समीकरणांची जुळवाजुळव रंगात आली आहे. कोण कुणासोबत जाणार, कोण स्वतंत्र लढणार, याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.




