जत तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद मतदारसंघांपैकी बनाळी जिल्हा परिषद गट हा एकमेव खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाला असून, विशेष म्हणजे या गटातील दोन्ही पंचायत समिती गणही खुले आहेत. परंपरेने काँग्रेस–राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या गटात यंदा मात्र हायव्होल्टेज आणि अटीतटीची लढत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. हा गट ताब्यात घेण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली असून, त्यामुळे जतसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष बनाळी गटाकडे लागले आहे.
महाविकास आघाडीकडून प्रकाशराव जमदाडे, भाजपकडून सुनीलभैय्या पवार, तर शिंदे गटाच्या सेनेकडून उद्योगपती महादेव हिंगमिरे यांच्या कन्या प्राची हिंगमिरे यांनीही तयारी सुरू केल्याने लढत अधिक रंगतदार होत आहे.
जागृत मतदारसंघाची ओळख
बनाळी जिल्हा परिषद गट हा जत तालुक्यातील अत्यंत जागृत, सुशिक्षित आणि पक्षापेक्षा उमेदवाराची प्रतिमा व काम पाहून मतदान करणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. आजवर या गटावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच वर्चस्व राहिले असले तरी, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर येथील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत.
विधानसभा निवडणुकीत बनाळी वगळता गटातील बहुतांश गावांत भाजपला मताधिक्य मिळाले असून, गावोगावी भाजपचा सक्षम संघटनात्मक गट उभा राहिला आहे. त्यामुळे यंदा भाजपनेही या गटात मोठे आव्हान निर्माण केले आहे.
मविआची एकजूट, भाजपसमोर कडवे आव्हान
हा गट कोणत्याही स्थितीत भाजपकडे जाऊ नये यासाठी महाविकास आघाडीने सखोल रणनिती आखली आहे. विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकांतील चुका सुधारत मविआने येथे एकजूट दाखवली आहे. माजी आमदार विक्रम सावंत, विलासराव जगताप आणि प्रकाशराव जमदाडे यांचा गट सध्या एकत्र आलेला दिसत असून, बैठका, संघटन बांधणी आणि ‘मेरिट’च्या उमेदवारांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.
मविआकडून प्रकाशराव जमदाडे आघाडीवर
जिल्हा बँकेचे संचालक आणि गटावर मजबूत पकड असलेले, तालुक्यातील पहिल्या फळीतील नेते प्रकाशराव जमदाडे यांचे नाव मविआकडून आघाडीवर आहे. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरल्याने जवळपास त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. जमदाडे आणि त्यांच्या समर्थकांसह मविआ पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचे चित्र आहे.
भाजपकडून सुनीलभैय्या पवारांची तयारी
भाजपकडून सुनीलभैय्या पवार गेल्या दोन महिन्यांपासून जोरदार तयारीला लागले आहेत. माजी पंचायत समिती सदस्य असलेले पवार यांच्या पत्नी याच गटातून जिल्हा परिषद सदस्या व सभापती राहिल्या आहेत. पडळकर बंधूंचे विश्वासू कार्यकर्ते अशी ओळख असलेल्या पवारांनी कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्याच्या दृष्टीने आखणी सुरू केली आहे.
पंचायत समिती गणात जातीय समीकरणे महत्त्वाची
जिल्हा परिषद उमेदवारीबाबत दोन्ही पक्षांत चित्र जवळपास स्पष्ट असले तरी, पंचायत समिती गणांसाठी उमेदवारांची निवड अत्यंत विचारपूर्वक केली जात आहे. क्रॉस व्होटिंगचा धोका टाळण्यासाठी दोन्ही बाजूंनी खबरदारी घेतली जात आहे.
भाजपकडून
बनाळी गण : मिलिंदबापू पाटील, संजीव सावंत, माणिक पाटील, बी. एस. यादव
येळवी गण : विजय रूपनूर, समाधान जगताप, चंद्रकांत घुटुगडे
मविआकडून
बनाळी गण : रविंद्र सावंत, प्रमोद सावंत, अण्णासाहेब कोडग, संतोष जगताप
येळवी गण : सुनील अंकलगी, मधुकर नरळे
बनाळी गटात खुल्या प्रवर्गातील, तर येळवी गणात ओबीसी प्रवर्गातील उमेदवार देण्यावर दोन्ही बाजूंनी भर आहे.
नाराजीनाट्याची शक्यता कायम
मविआ आणि भाजपकडे तगडे इच्छुक असले तरी, पंचायत समिती उमेदवारीवरून अंतर्गत नाराजी, दगाबाजी आणि क्रॉस व्होटिंगची भीती दोन्ही पक्षांसमोर आहे. उमेदवारांनी फॉर्म भरण्याची तयारी सुरू केली असली तरी, येणाऱ्या चार दिवसांत बनाळी गटात मोठ्या व अनपेक्षित घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.




