जत तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील मानल्या जाणाऱ्या संख जिल्हा परिषद गटात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे.तालुक्याचे मध्यवर्ती केंद्र असणाऱ्या संखवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकावण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांनी आक्रमक रणनिती आखली आहे.शिवसेना शिंदे गटानेही मोठी तयारी केली आहे.
आजवर संखचे राजकारण स्व.बसवराज पाटील आणि डॉ.आर.के.पाटील यांच्या भोवतीच केंद्रित राहिले आहे.त्यामुळे यंदाची लढत ही केवळ पक्षीय नसून दोन पाटील घराण्यांमधील प्रतिष्ठेची ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.दुसरीकडे शिवसेनेचे नेते प्रविण आवरादी यांनीही त्यांच्या पत्नी कावेरी आवरादी यांनी मोठे शक्ति पदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने.संखचा सत्तासंघर्ष आणखीन तीव्र झाला आहे.
भाजपने डॉ.आर.के.पाटील यांच्या स्नुषा सौ.कविता किरण पाटील यांना मैदानात उतरवले असून, मविआकडून स्व. बसवराजकाका पाटील यांच्या कन्या प्रा. सौ.भारती पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.तर शिवेसना शिंदे गटाकडून कावेरी आवरादी या मैदानात उतरणार आहेत.
पूर्व भागाचा ‘किंगमेकर’ ठरलेला संख गट
जतच्या नऊ जिल्हा परिषद गटांपैकी नेहमीच चर्चेत राहिलेला संख गट ज्याच्या ताब्यात राहतो, तो पूर्व भागाचा किंगमेकर ठरतो, हा इतिहास आहे. अनेक वर्षे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लोकनेते स्व.बसवराज पाटील यांची येथे एकहाती सत्ता अबाधित राहिली. काही काळ मतदारांनी डॉ.आर.के.पाटील गटालाही संधी दिली होती. त्या काळात माजी आमदार विलासराव जगताप आणि विक्रम सावंत यांची भूमिका निर्णायक ठरली होती.आता प्रवीण अवरादी यांनीही मोठे वातावरण निर्माण केल्याने पाटील कुंटंबासह नवीन एका कुंटुंबाच्या निवडणूकीतील प्रवेशाने लढत तुल्यबंळ होणार आहे.
बसवराजकाकांनंतरची पहिलीच निवडणूक
जतच्या राजकारणातील धुरंधर म्हणून ओळख असलेल्या स्व. बसवराज पाटील यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने या लढतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांचा राजकीय वारसा युवा नेते व उपसरपंच सुभाष पाटील पुढे नेत असून, संघटनकौशल्य, लोकप्रियता आणि संयमी व्यक्तिमत्त्वामुळे ते चर्चेत आहेत.मविआकडून मैदानात उतरलेल्या प्रा. भारती पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तसेच जयंत पाटील यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांची मजबूत साथ असल्याचे चित्र आहे.
भाजपची तगडी खेळी
दुसरीकडे भाजपनेही तितक्याच ताकदीने आव्हान उभे केले आहे. प्रा. कविता किरण पाटील यांच्या पाठीशी डॉ. आर. के. पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अलिकडच्या काळात युवा नेते विजयराव पाटील व किरण पाटील यांनी गटात केलेली संघटनात्मक बांधणी भाजपसाठी फायदेशीर ठरत असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय आमदार गोपीचंद पडळकर यांची भक्कम साथ भाजपला मिळत आहे. कोणत्याही परिस्थितीत संख हे मध्यवर्ती केंद्र जिंकण्याचा भाजपचा निर्धार दिसून येत आहे.
उलटफेराची शक्यता, दोन दिवस निर्णायक
सध्यस्थितीत संख गटात भाजप विरुद्ध मविआ असा थेट सामना दिसत असला, तरी पुढील दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. संख आणि गिरगाव पंचायत समिती गणात इच्छुकांची संख्या मोठी असून, मित्रपक्षांकडूनही उमेदवारीचे दावे केले जात आहेत.
मविआमध्ये विक्रम सावंत व विलासराव जगताप गटाचा निर्णय निर्णायक ठरणार आहे. तर भाजपमध्ये क्रॉस व्होटिंग, जुने वाद आणि जातीय समीकरणांचा फटका बसू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. उमेदवारी डावलली गेल्यास ऐनवेळी रणनितीत बदल व उलटफेर होण्याचीही शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
स्वतंत्र तालुक्याचा मुद्दा केंद्रस्थानी
या संपूर्ण निवडणुकीत दोन पाटील घराण्यांच्या प्रतिष्ठेसोबतच संख स्वतंत्र तालुका निर्मितीचा मुद्दा केंद्रस्थानी राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संख गटाची ही निवडणूक केवळ स्थानिक नव्हे, तर संपूर्ण जत तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार आहे.




