जत : जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संख जिल्हा परिषद गटातून जनस्वराज्य पक्ष कडून प्रियांका रघुनाथ सबकाळे यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी गिरगाव पंचायत समिती गणातून नागनाथ मोटे, तर संख पंचायत समिती गणातून बिरप्पा खोत यांनीही जनस्वराज्य पक्षाकडून आपले उमेदवारी अर्ज सादर केले.
संख जिल्हा परिषद गट हा पूर्वीपासूनच जनस्वराज्य पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो.

या मतदारसंघात पक्षाला मोठा जनाधार लाभलेला असून, पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक कोरे सावकार यांनी या भागाच्या विकासासाठी सातत्याने विशेष लक्ष देत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांमुळे पक्षाची भक्कम पकड अधिक मजबूत झाली आहे.
या मतदारसंघातून यापूर्वी स्वर्गीय बसवराज पाटील हे जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते व त्यांना उपाध्यक्षपदाचा मान मिळाला होता. तसेच जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला सदस्य होण्याचा मान सौ. सुजाता पाटील यांना मिळाला होता. गिरगाव पंचायत समिती गणातून ऍड. अडव्याप्पा घेरडे यांनी निवडून येत जत पंचायत समितीच्या उपसभापतीपदाची जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडली होती.
आजपर्यंत राबविण्यात आलेल्या विकासकामांच्या जोरावरच आम्ही या निवडणुकीला सामोरे जात असल्याचे सांगत, जनतेच्या विश्वासावर आणि कामगिरीवर आधारित आमचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास युवा नेते नागनाथ मोटे व रघुनाथ सबकाळे यांनी व्यक्त केला.
उमेदवारी अर्ज दाखल होताच संख तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी निवडणुकीत जनस्वराज्य पक्ष आणि प्रतिस्पर्ध्यांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.




