अहो..आम्ही खरंच…  प्रत्यक्षात,युद्ध नौका आणि पाणबुडी पाहिली…

0
19

*युद्ध नौका आणि पाणबुडी पाहिली…

*उमराणी व खोजनवाडीच्या विद्यार्थ्यांचा थरारक अनुभव* 

 असे म्हणतात ना.. की जे न पाहे रवि ते पाहे कवि… अगदी असेच घडले.. पण त्या कवीच्या ऐवजी प्रत्यक्षात होते ते  सांगली जिल्ह्यातील उमराणी व खोजनवाडी सारख्या ग्रामीण भागातील आमचे शालेय विद्यार्थी. या शालेय विद्यार्थ्यांना जे सर्वसामान्य जनतेला सहजासहजी पाहता येत नाही  ते सहजतेने पाहण्याचे भाग्य लाभले. त्यांच्या बालिश आणि चौकस नजरेने ते सर्व टिपले. मनाच्या   आठवण रुपी कुपीत कायमचे कोरले गेले. आम्हीही मोठे होऊन अशाच प्रकारच्या क्षेत्रात म्हणजे देश सेवेच्या क्षेत्रात काम करू असा विचार त्यांच्या बालमनात नक्कीच आला. अर्थातच हा विचार येणे साहजिकच आहे कारण सांगली जिल्हा हा वीरांचा देशभक्तांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे हा विचार प्रत्यक्षात आणणे या मुला-मुलींना कठीण नाही. असो.

   अलिबाग येथील गाज फाउंडेशन यांच्या सहकार्याने या शालेय विद्यार्थ्यांना ही प्रत्यक्ष युद्ध लोकांनी पाणबुडी पाहण्याची अभूतपूर्वक संधी लाभली. अगदी काही दिवसापूर्वी म्हणजे 11 जानेवारीला उमराणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित उमराणी हायस्कूल उमराणी आणि खोजनवाडी कन्नड माध्यमिक विद्यालय खोजनवाडी येथील 40 मुला मुलींना गाज फाउंडेशनने भारतीय नौसेना तळ आयएनएस आंग्रे या पश्चिमी नौसेना कमान मुख्यालयात भेट देऊन हे पाहण्याची संधी दिली. विद्यार्थ्यांनी याची देही याची डोळा अजस्त्र अशी ही आपली भारतीय युद्ध सामग्री पाहिली. 

     या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना भारतीय नौसेनेतील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. युद्धनौका पाहताना विद्यार्थ्यांच्या नजरेत असलेले आश्चर्याचे भाव, मनात उठलेले विचारांचे काहूर, आणि हे सर्व जवळून पाहण्याचा अनुभव असा भावभावनांचा त्रिवेणी संगम यावेळी झालेला होता.

     भारतीय नौसेनेत कार्यरत INS सुभद्रा ही युद्ध नौका तसेच INS शिशूमार ही पाणबुडी चक्क आतून पाहण्याची संधी प्राप्त झाली. पाणबुडीवरील भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना नौसैनिकांचे जीवन जवळून अनुभवता आले. टारपिडो तसेच पाणबुडीची संचालन प्रणाली तेथील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. अत्यंत मन लावून विद्यार्थी हे सर्व ऐकत होते अनुभवत होते.

INS सुभद्रा या फास्ट इंटरसेप्टर नौकेवर विद्यार्थ्यांना हेलिपॅड, हँगर, लॉंग रेंज गन तसेच रडार सिस्टीम ची कार्यप्रणाली जवळून पाहता आली. विद्यार्थ्यांना नौकेच्या ब्रिजवर (जेथून कप्तान नौकेचे संचालन करतात ती जागा) जाऊन आतील क्लिष्ट परंतु तंत्रज्ञानाने प्रगत असलेली रडार, नौका संचलन प्रणाली जवळून पाहण्याचा अनुभव घेतला.

      ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नौसैनिकांशी संवादातून नौदलाची कार्यप्रणाली, करिअरच्या संधी आणि भारतीय सेनादलाची सामरिक सिद्धता यांची प्रत्यक्ष अनुभूती घेता आली. या भेटीनंतर विद्यार्थ्यांनी   INS आंग्रे तेथे हेरिटेज हॉल आणि सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार दल प्रमुख सरखेल कान्होजीराव आंग्रे यांना वंदन केले.आणि भारतीय नौदलाच्या तळाचा निरोप घेतला. मनातील देश प्रेमाचे देशभक्तीचे विचार अधिक ठाम झाले. एका देशभक्तीपर मोहिमेची समर्थ सांगता झाली.

……..

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here