डफळापूर पंचायत समिती निवडणूक ताकदीने लढवणार | – दिपक माळी

0
20

डफळापूर : डफळापूर पंचायत समिती निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून पूर्ण ताकदीने लढवणार असल्याची ठाम भूमिका जिरग्याळचे माजी सरपंच दिपक माळी यांनी जाहीर केली आहे. विकास, पारदर्शकता आणि जनतेशी थेट संवाद या त्रिसूत्रीवर निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

दिपक माळी हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून जिरग्याळचे सरपंच म्हणून त्यांनी प्रभावी आणि लोकाभिमुख कारभार केला आहे. त्यांच्या कार्यकाळात मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शिक्षण व सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या. शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जाते.

डफळापूर पंचायत समिती गणातील जिरग्याळसह खलाटी, मिरवाड, शेळकेवाडी, शिंगणापूर, कुडणूर या गावांमध्ये दिपक माळी हे सातत्याने जनतेच्या संपर्कात आहेत. प्रत्येक गावातील समस्या, गरजा आणि विकासाच्या संधी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. शेती, पाणीटंचाई, रोजगार, आरोग्य आणि युवकांच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच ठोस भूमिका मांडली आहे.

“राजकारणापेक्षा जनसेवा महत्त्वाची आहे. पद हे साधन असून उद्दिष्ट गावांचा विकास आहे,” असे स्पष्ट करत दिपक माळी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यामागील भूमिका मांडली. पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक प्रश्नांना न्याय देणारा प्रतिनिधी पंचायत समितीत हवा असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व गावांना समान न्याय, निधीचा योग्य वापर आणि विकासकामांची वेळेत अंमलबजावणी ही त्यांची प्रमुख प्राधान्ये असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यापुढील काळातही जनतेच्या विश्वासावर खरे उतरून काम करणार असून पंचायत समितीच्या माध्यमातून या गणातील सर्व गावांचा समतोल व शाश्वत विकास साधण्यासाठी कटिबद्ध असल्याचे दिपक माळी यांनी सांगितले. या गणातील मतदारांनी विकासासाठी, स्वच्छ व पारदर्शक कारभारासाठी आपल्याला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

डफळापूर पंचायत समिती निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून दिपक माळी यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून निवडणूक प्रचाराला आता वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here