कवठेपिरान : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत यंदा महिला व ओबीसी आरक्षणाने अनेक दिग्गज नेत्यांना जोरदार धक्का दिला असून, कवठेपिरान जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय चुरस कमालीची वाढली आहे. “कवठेपिरानचा गड नेमका कोण राखणार?” असा प्रश्न उपस्थित होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भाजप यांच्यात तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
कवठेपिरान जिल्हा परिषद मतदारसंघावर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले आहे. मात्र, हे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी आमदार जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.
यावेळी आरक्षणामुळे राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. जिल्हा परिषद गटासाठी ओबीसी महिला, दुधगाव पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण महिला, तर कवठेपिरान पंचायत समितीसाठी ओबीसी पुरुष असे आरक्षण निश्चित झाले आहे.
कवठेपिरान जिल्हा परिषद गटामध्ये कवठेपिरान व दुधगाव हे दोन पंचायत समिती गण येतात. कवठेपिरान गणात सावळवाडी व माळवाडी या गावांचा समावेश आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून मीना सचिन पाटील यांनी जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुधगाव पंचायत समिती गणासाठी मिरा भोसले व स्नेहल पाटील यांनी अर्ज दाखल केले असून, कवठेपिरान पंचायत समिती गणातून अरविंद सपकाळ यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी नोंदवली आहे.
दुसरीकडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्हा परिषद गणासाठी सुनंदा कोळी यांनी अर्ज दाखल केला आहे. दुधगाव पंचायत समिती गणातून विद्यमान सदस्य जयश्री डांगे व सुवर्णा दळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तसेच कवठेपिरान पंचायत समिती गणासाठी स्वाभिमानीकडून अनिल आमटवणे व चंदू सावंत यांनी अर्ज दाखल केल्याने स्वाभिमानीचीही मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
भाजपनेही या मतदारसंघात ताकद दाखवण्यास सुरुवात केली असून, जिल्हा परिषदेसाठी स्वाती सोमनाथ गावडे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
एकंदरीत आरक्षणामुळे समीकरणे बदलली असून, कवठेपिरान जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादी, स्वाभिमानी आणि भाजप यांच्यातील ही तिरंगी लढत कोणाच्या बाजूने झुकणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.




