विमान अपघातातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्र शोकसागरात

0
5


राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या घटनेने राजकीय, सामाजिक तसेच प्रशासकीय क्षेत्रातून तीव्र दुःख व्यक्त केले जात असून, राज्य एक उमदा, अभ्यासू आणि संवेदनशील नेतृत्व गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. “हे न कळणारे आणि न पचणारे सत्य आहे. इतक्या उमद्या आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला आपण कायमचे मुकलो आहोत,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, “इतक्या सक्रिय आणि कर्तव्यदक्ष नेत्याचे अचानक जाणे मन मान्य करायला तयार नाही. कालपर्यंत आपण एकत्र होतो आणि आज त्यांच्या जाण्याची बातमी ऐकावी लागते, हे भास आहे की स्वप्न असा प्रश्न पडावा.”


अजित पवार हे प्रशासनावर मजबूत पकड असलेले, अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. गेल्या ३५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनात त्यांनी आमदार, खासदार, उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करून निर्णय घेण्याची त्यांची कार्यपद्धती सर्वश्रुत होती.
या कठीण प्रसंगी राज्य सरकार, राजकीय सहकारी तसेच संपूर्ण महाराष्ट्र पवार कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असे नमूद करत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here