आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कुशल व प्रभावी नेतृत्वाखाली डफळापूर जिल्हा परिषद गट तसेच डफळापूर व बाज पंचायत समिती गणांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिन्ही उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या गटातील तिन्ही उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास भाजप युवा नेते परशुराम चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
डफळापूर गटातील विविध गावांमध्ये प्रचार दौऱ्यावर असताना परशुराम चव्हाण यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विकासकामांची माहिती देत भाजप सरकारच्या कार्यकाळात झालेल्या पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण तसेच शेतकरी हिताच्या योजनांचा उल्लेख केला. भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणल्यामुळे मतदारांचा कल भाजपकडे झुकलेला असल्याचे त्यांनी सांगितले.
डफळापूर जिल्हा परिषदेसाठी सौ. स्वप्नाली मनोज मासाळ, बाज पंचायत समितीसाठी सौ. मनीषा भाऊसाहेब दुधाळ तसेच डफळापूर पंचायत समितीसाठी महेश अशोकराव गावडे हे तिन्ही उमेदवार सक्षम, अनुभवी व विकासाभिमुख असल्याचे परशुराम चव्हाण यांनी नमूद केले. या उमेदवारांना प्रशासनाचा अनुभव असून स्थानिक प्रश्नांची चांगली जाण आहे. त्यामुळे निवडून आल्यानंतर ते मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावीपणे काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार गोपीचंद पडळकर तसेच जतचे नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आणि तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या विकासाच्या दूरदृष्टीपूर्ण धोरणांचा लाभ डफळापूर गटालाही निश्चितपणे होणार आहे. रस्ते, जलसंधारण, आरोग्य सुविधा, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगारनिर्मिती तसेच शेतकऱ्यांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यावर भाजपचा भर असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
प्रचारादरम्यान नागरिकांनी विविध समस्या व अपेक्षा मांडल्या असून, त्या सोडविण्यासाठी भाजपचे उमेदवार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “जनतेचा वाढता विश्वास, कार्यकर्त्यांची ताकद आणि विकासाचे ठोस व्हिजन यामुळे डफळापूर गटात भाजपाच्या तिन्ही उमेदवारांचा विजय निश्चित आहे,” असे ठाम मत परशुराम चव्हाण यांनी व्यक्त केले.
एकूणच डफळापूर गटात भाजपच्या प्रचाराला मिळणारा प्रतिसाद आणि जनतेचा उत्साह पाहता, येत्या निवडणुकीत भाजप मोठ्या फरकाने यश संपादन करेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.




