डफळापूर पंचायत समिती गणात कॉ.हणमंत कोळींना मोठा पाठिंबा

0
35


डफळापूर पंचायत समिती गणामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कॉ. हणमंत कोळी यांना मतदारांकडून वाढता आणि भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. संघर्ष, चळवळ आणि जनआंदोलनातून घडलेले युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले कॉ. हणमंत कोळी हे Communist Party of India (Marxist) पक्षाकडून ‘विळा–हातोडा’ या निवडणूक चिन्हावर पंचायत समिती निवडणूक लढवत आहेत. मतदारांशी थेट संवाद, सातत्यपूर्ण संपर्क आणि जनहिताच्या प्रश्नांवरील ठाम भूमिका यामुळे त्यांच्या प्रचाराला चांगलीच गती मिळाली आहे.
या संदर्भात आपली भूमिका मांडताना कॉ. हणमंत कोळी म्हणाले की, “माझ्याकडे कोणताही राजकीय वारसा नाही, मोठे आर्थिक पाठबळही नाही. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष आणि आंदोलनाच्या माध्यमातून मी सामान्य जनतेसाठी न्याय मिळवून देण्याचे काम प्रामाणिकपणे करत आलो आहे.

मी या भागातील जनतेतूनच उभा राहिलेला सामान्य कार्यकर्ता आहे आणि त्यामुळेच लोकांचा विश्वास माझ्या पाठीशी उभा आहे.” त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, या निवडणुकीतील त्यांची लढाई ही वैयक्तिक स्वार्थासाठी नसून पंचायत समिती गणातील जनतेच्या हक्कांसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी आहे.


कॉ. कोळी पुढे म्हणाले की, कामगार, शोषित घटक, आशा वर्कर्स, तसेच असंघटित क्षेत्रातील कामगार यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने लढा दिला आहे. अनेक वेळा अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करताना प्रसंगी गुन्हेही अंगावर घ्यावे लागले, मात्र तरीही जनतेच्या न्यायासाठी मागे न हटण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली. “या भागातील शेकडो बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासकीय योजनांमधून आर्थिक मदत मिळवून देण्याचे कामही आम्ही केले आहे,” असे त्यांनी सांगितले.


सर्वच शोषित आणि वंचित घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचाव्यात, यासाठी केवळ कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. “जनतेला पाठबळ मिळावे, त्यांच्या जीवनात स्थैर्य यावे, हा एकमेव स्वच्छ उद्देश डोळ्यांसमोर ठेवून आम्ही काम करत आहोत. निवडणूक जिंकल्यानंतरही हाच संघर्षाचा आणि लोकांच्या बाजूने उभे राहण्याचा मार्ग आम्ही कायम ठेवू,” असे आश्वासन कॉ. हणमंत कोळी यांनी दिले.


डफळापूर पंचायत समिती गणातील मतदारांमध्ये त्यांच्या या स्पष्ट, संघर्षशील आणि जनाभिमुख भूमिकेबद्दल सकारात्मक चर्चा सुरू असून, या पाठिंब्याच्या जोरावर आपला विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. पंचायत समिती निवडणुकीत हा जनाधार निर्णायक ठरेल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here