१० वर्षांच्या जखमेचा रक्तरंजित शेवट; आईला पळवणाऱ्याचा मुलाकडून निर्घृण खूनहत्येनंतर मृतदेहावर पाय देत पोलिसांची वाट पाहणारा आरोपी

0
20


बेळगाव | सावदत्ती
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील सावदत्ती तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी, थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे. भररस्त्यात झालेल्या या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी पळून न जाता मृतदेहाच्या छातीवर पाय ठेवून पोलिसांची वाट पाहत उभा राहिल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.


ही घटना सोमवारी सायंकाळी हुलिकुट्टी गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यावर घडली. बसडोनी गावचा रहिवासी बसप्पा होसमानी (वय ५१) रस्त्यावरून जात असताना, आधीच दबा धरून बसलेल्या एरय्या मठपती याने धारदार शस्त्राने अचानक हल्ला चढवला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आरोपीने बसप्पावर सलग १६ वार केले. गंभीर जखमांमुळे बसप्पाचा जागीच मृत्यू झाला.


हत्येनंतरचे आरोपीचे वर्तन अधिकच भयावह ठरले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बसप्पाच्या मृतदेहाजवळ एरय्या थांबून राहिला आणि मृतदेहाच्या छातीवर पाय ठेवून पोलिसांची वाट पाहू लागला. हे दृश्य पाहणाऱ्या पादचाऱ्यांच्या मनाचा थरकाप उडाला. सावदत्ती हे यल्लम्मा देवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असून येथे भाविकांची नेहमीच वर्दळ असते. अशा गजबजलेल्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.


पोलिसांच्या प्राथमिक तपासात या हत्येमागील धक्कादायक कारण समोर आले आहे. मृत बसप्पा आणि आरोपी एरय्या यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वैर होते. सुमारे १० वर्षांपूर्वी बसप्पा हा एरय्याच्या आईला घेऊन पळून गेला होता. त्यानंतर दोघे काही काळ कोल्हापूर येथे वास्तव्यास होते. आईला पळवून नेल्याचा राग एरय्याच्या मनात सतत धुमसत होता. काही दिवसांपूर्वीच बसप्पा पुन्हा आपल्या गावी परतल्याची माहिती मिळताच एरय्याने जुन्या वैराचा बदला घेण्याचा कट आखला आणि संधी साधून त्याने बसप्पाचा खून केला.


विशेष म्हणजे, हत्येनंतर आरोपीने स्वतःच सावदत्ती पोलिसांना फोन करून गुन्ह्याची कबुली दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी आरोपी मृतदेहाच्या छातीवर पाय ठेवून उभा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले असून, त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


टीप: बातमीतील व्यक्तीचा फोटो मूळ (Original) असून, सादरीकरण व ग्राफिक्ससाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here