सांगली जिल्हा परिषदेतील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय तणाव उघडपणे समोर आला आहे. शिवसेनेचे नेते आणि जिल्हा संपर्कप्रमुख शंभूराज देसाई यांनी भाजपला स्पष्ट शब्दांत इशारा देत, “आमचा पाठिंबा गृहीत धरू नका,” अशी ठाम भूमिका जाहीर केली आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना देसाई म्हणाले की, जिल्हा परिषदेतील सत्तेबाबत चंद्रकांत पाटील यांच्यासोबत कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही. असे असताना भाजपने शिवसेनेचा पाठिंबा गृहीत धरणे योग्य नाही. “आम्ही ही निवडणूक स्वतंत्रपणे लढलो आहोत. त्यामुळे आमचा निर्णय आम्हीच घेऊ. आमच्या वतीने निर्णय घेणारे भाजप कोण?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
महानगरपालिका निवडणुकीतील भाजपच्या भूमिकेची आठवण करून देत, जिल्हा परिषदेत शिवसेना स्वतःची रणनीती ठरवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “ज्यावेळी गरज भासते, तेव्हाच चर्चा केली जाते. मात्र, आम्ही आमचा राजकीय निर्णय स्वबळावर घेऊ,” असे देसाई यांनी नमूद केले.
देसाई यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे सांगलीच्या राजकारणात खळबळ उडाली असून, आगामी काळात जिल्हा परिषद सत्तेची गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भाजप-शिवसेना युतीतील दरी वाढल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.




