कोरबा (छत्तीसगड) |
छत्तीसगडमधील कोरबा येथे आठ वर्षांपूर्वी घडलेल्या न्यूज अँकर सलमा सुल्ताना हिच्या हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. तब्बल आठ वर्षे तपास यंत्रणांसाठी कोडे ठरलेल्या या प्रकरणात पोलिसांनी सलमाचा लिव्ह-इन पार्टनर मधुर साहू याला अटक केली असून, एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या कबुलीमुळे तपासाला निर्णायक कलाटणी मिळाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मधुर साहू आणि सलमा सुल्ताना यांच्यात आर्थिक कारणांवरून व इतर वैयक्तिक वादांवरून सतत खटके उडत होते. या वादाचे पर्यवसान अखेरीस हत्येमध्ये झाले. आरोपीने सलमाची गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे साक्षीदाराने दिलेली माहिती. त्याच्या म्हणण्यानुसार, हत्या केल्यानंतर आरोपीच्या चेहऱ्यावर कोणतेही पश्चातापाचे भाव नव्हते. उलट, मृतदेहाची विल्हेवाट लावताना तो शांतपणे गाणे गुणगुणत होता. साक्षीदाराच्या दाव्यानुसार, कोरबा-दर्री मार्गावरील निर्माणाधीन पुलाखाली मृतदेह पुरताना आरोपी ‘आनंद’ चित्रपटातील प्रसिद्ध गाणे “कहीं दूर जब दिन ढल जाए…” म्हणत होता.

गेल्या आठ वर्षांत आरोपींकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याने साक्षीदार भीतीपोटी गप्प राहिला होता. मात्र अलीकडे त्याने धाडस करून पोलिसांकडे माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ‘एलपीआर’ (License Plate Recognition) प्रणाली आणि सॅटेलाइट मॅपिंगच्या साहाय्याने संशयित ठिकाण निश्चित केले.
जेसीबीच्या साहाय्याने करण्यात आलेल्या खोदकामात जमिनीखाली गुंडाळलेल्या अवस्थेत मानवी सांगाडा आढळून आला. हा सांगाडा डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात आला असून, अहवालानंतर ओळख अधिकृतपणे निश्चित होणार आहे. या प्रकरणात मधुर साहू याच्यासह त्याच्या काही साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे.
आठ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणात नव्या पुराव्यांमुळे न्यायप्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
टीप: बातमीतील व्यक्तींचे छायाचित्र मूळ (Original) असून, सादरीकरण व ग्राफिक्ससाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.




