जिवलग मित्रावर विश्वास ठेवणाऱ्या ट्रक चालकाचा त्याच मित्रानेच घात केला, आणि या कटात पत्नीही सामील असल्याचे उघड होताच सुल्तानपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. लंभुआ कोतवाली क्षेत्रातील मदनपूर पनियार गावात ही धक्कादायक घटना घडली.
अमित सिंग (व्यवसाय – ट्रक चालक) आणि दीपक हे दोघे जिवलग मित्र होते. व्यवसाय समान असल्याने दीपकचे अमित यांच्या घरी नेहमी येणे-जाणे होते. याच दरम्यान दीपक आणि अमित यांची पत्नी शिल्पी सिंग यांच्यात जवळीक वाढत गेली. पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधांत झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
या संबंधांची माहिती मिळाल्यानंतर अमित यांनी विरोध केला होता. त्यामुळे पती अडसर ठरत असल्याची भावना निर्माण झाल्याने शिल्पी आणि दीपक यांनी मिळून अमित यांना मार्गातून हटवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. ठरल्याप्रमाणे अमित यांची हत्या करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक चौकशीनंतर पत्नी शिल्पी सिंग हिला ताब्यात घेण्यात आले असून मुख्य आरोपी दीपक फरार आहे. त्याच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
या घटनेने मैत्री, विश्वास आणि नातेसंबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
टीप : संबंधित व्यक्तींचा फोटो मूळ असून सादरीकरणासाठी ग्राफिक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.




