भिगवण/बारामती : इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे घडलेल्या कथित अपहरण प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले आहे. भरदिवसा २१ वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी दाखल केली होती; मात्र संबंधित तरुणीनेच पोलिसांसमोर हजर राहून “माझे अपहरण झालेले नाही, मी स्वमर्जीने गेले,” असा ठाम खुलासा केल्याने प्रकरणात मोठी खळबळ उडाली आहे.
मंगळवारी (दि. १७) दुपारी चारच्या सुमारास तरुणी आई व भावासोबत लग्नाच्या बस्त्यासाठी सोन्याची खरेदी करून दुचाकीवरून घरी परतत असताना दोन सख्ख्या भावांनी त्यांच्यावर हल्ला करून डोळ्यांत मिरचीपूड टाकली व तरुणीला जबरदस्तीने टेम्पोत बसवून पळवून नेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, संबंधित तरुणी बुधवारी मध्यरात्री सुमारे १.३० वाजता स्वतःहून बारामती शहर पोलीस ठाणे येथे हजर झाली. त्यानंतर आज दुपारी संदीप गिल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली.
एसपी गिल यांनी सांगितले की, कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आई व भावाचा जबाब नोंदवण्यात आला असून तरुणीचाही सविस्तर जबाब घेण्यात आला आहे. मात्र दोन्ही बाजूंच्या जबाबांमध्ये मोठी विसंगती आढळून येत आहे. न्यायालयासमोरही तरुणीने आपण स्वेच्छेने घराबाहेर पडल्याचे स्पष्ट केले आहे. आईसोबत जाण्यास तिने नकार दिल्याचेही पोलिसांनी सांगितले.
प्रवासाची माहिती
घराबाहेर पडल्यानंतर तरुण-तरुणीने श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे, सासवड असा प्रवास करत महाबळेश्वर गाठले. तेथून ते थेट बारामती येथे पोलीस ठाण्यात हजर झाले. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव संबंधित तरुणाला पहाटे खासगी वाहनातून अज्ञातस्थळी हलविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्रतिज्ञापत्रातील दावे
तरुणीने पोलिसांना दिलेल्या लेखी प्रतिज्ञापत्रात महत्त्वाचे दावे केले आहेत. तिचे व संबंधित तरुणाचे मागील एका वर्षापासून प्रेमसंबंध असल्याचे तिने नमूद केले आहे. ही बाब घरच्यांना सांगितली होती; मात्र कुटुंबीयांकडून तिचे दुसरे लग्न लावण्याचा दबाव टाकला जात होता. त्या दबावामुळेच तिने स्वतःच्या इच्छेने घर सोडल्याचे ती म्हणाली आहे.
आईने दाखल केलेल्या फिर्यादीतील मिरचीपूड फेकणे, नथ व चांदीची अंगठी हिसकावून नेणे हे आरोप खोटे असल्याचा दावा तरुणीने केला आहे. कोणाच्या तरी दबावाखाली ही तक्रार देण्यात आल्याचा आरोपही तिने केला. “मी कायदेशीरदृष्ट्या सज्ञान असून माझ्या आयुष्याबाबत निर्णय घेण्याचा मला अधिकार आहे,” अशी भूमिका तिने मांडली आहे.
तपास सुरूच
दरम्यान, दोन्ही बाजूंच्या जबाबांतील तफावत लक्षात घेता पोलीस अधिक सखोल तपास करत आहेत. परिस्थिती संवेदनशील असल्याने कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.
टीप: बातमीतील व्यक्तीचा फोटो मूळ आहे. सादरीकरण व ग्राफिक्ससाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.




