सोलापूर : आयुष्यातील सर्वात मोठ्या दुःखाच्या क्षणीही कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या एका विद्यार्थिनीची आणि तिला साथ देणाऱ्या शिक्षक-प्रशासनाची हृदयस्पर्शी घटना सोलापूरमध्ये घडली आहे.
सोलापूर येथील शरदचंद्र पवार प्रशाला येथे इयत्ता दहावीमध्ये शिकणारी धनश्री भिकाजी पवार हिच्या आयुष्यात शुक्रवारी सकाळी दुर्दैवी घटना घडली. तिचे वडील भिकाजी पवार यांचे अल्पशा आजाराने अचानक निधन झाले. घरात दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच त्याच दिवशी दहावीच्या परीक्षेचा मराठी विषयाचा पहिला पेपर होता.
अंत्यविधीची तयारी सुरू होती, नातेवाईक व शेजारी मोठ्या संख्येने जमा होत होते. अशा परिस्थितीत धनश्रीचा पहिलाच पेपर बुडणार का, तिच्या वडिलांनी पाहिलेली स्वप्ने अपुरी राहणार का, अशी चिंता शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना लागून राहिली होती.
प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी तातडीने धनश्रीच्या घरी जाऊन कुटुंबीयांशी चर्चा केली. दोन तास अंत्यविधी पुढे ढकलण्याची विनंती करत धनश्रीला मानसिक धीर दिला. तिला स्वतः परीक्षा केंद्रावर नेऊन बसविण्यात आले.
मात्र पूर्ण तीन तास पेपर देणे धनश्रीसाठी शक्य नव्हते. त्यामुळे मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना संपर्क साधला.
परिस्थितीची कल्पना मिळताच शिक्षणाधिकारी जगताप यांनी केंद्रप्रमुख श्रीमती गीता सादुल यांच्याशी चर्चा करून धनश्रीला अर्ध्या वेळेनंतर सोडण्याची परवानगी दिली.
विशेष म्हणजे शिक्षणाधिकारी सचिन जगताप स्वतः परीक्षा केंद्रावर पोहोचले आणि धनश्रीला धीर देत तिच्या पाठीशी उभे राहिले. दीड तास पेपर लिहिल्यानंतर मुख्याध्यापकांनी तिला सेवक संतोष लोंढे यांच्या वाहनातून अंत्यविधीसाठी पुन्हा घरी आणले.
धनश्रीच्या या धैर्याने उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. नातेवाईक, शेजारी, शिक्षक, संस्थाचालक आणि प्रशासन या सर्वांनी तिच्या जिद्दीचे कौतुक केले. शिक्षणासोबत मानवी मूल्ये जपणाऱ्या या घटनेने सोलापूर जिल्ह्यात भावनिक वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना केवळ एका विद्यार्थिनीच्या धैर्याची नव्हे, तर संवेदनशील प्रशासन आणि शिक्षकांच्या कर्तव्यदक्षतेची साक्ष देणारी ठरली आहे.




