आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर उपाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी

0
12

मुंबई, प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तब्बल आठ महिन्यांनंतर राज्य कार्यकारिणीची घोषणा करत संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल केले. नव्या कार्यकारिणीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर उपाध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली असून, पश्चिम महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत त्यांनी पक्ष संघटनात आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात ओबीसी व बहुजन समाजातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या पडळकर यांना देण्यात आलेली ही बढती आगामी २०२९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. संघटन विस्तार, कार्यकर्त्यांचे बळकटीकरण आणि ग्रामीण भागातील पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी त्यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत नव्या कार्यकारिणीची माहिती देताना सांगितले की, “पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता सक्षम आहे. ज्यांना यादीत स्थान मिळाले नाही, त्यांनाही आगामी काळात संघटनेच्या विविध जबाबदाऱ्यांमध्ये सामावून घेतले जाईल.”

नव्या कार्यकारिणीत १२ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, १२ चिटणीस आणि विविध आघाडी प्रमुखांसह एकूण ४३ जणांचा समावेश आहे. केशव उपाध्ये यांच्या जागी नवनाथ बन यांची मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मिहीर कोटेचा यांची कोषाध्यक्ष, अरुण लखानी यांची सहकोषाध्यक्ष, रवींद्र अनासपुरे यांची मुख्यालय प्रभारी तर विश्वास पाठक यांची मुख्यालय सहप्रभारी म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली.

तसेच विविध मोर्चांच्या अध्यक्षपदीही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी कृष्णराज महाडिक, महिला मोर्चा अध्यक्षपदी चित्रा वाघ, ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी योगेश टिळेकर, किसान मोर्चा अध्यक्षपदी रामकृष्ण वेताळ, एससी मोर्चा अध्यक्षपदी विश्वजीत गायकवाड, एसटी मोर्चा अध्यक्षपदी देवराव होळी, भटके विमुक्त मोर्चा अध्यक्षपदी नरेंद्र पवार आणि अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षपदी इद्रिस मुलतानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने सर्व घटकांचा समावेश असलेली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. विशेषतः आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर सोपवलेली उपाध्यक्षपदाची जबाबदारी पश्चिम महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढविण्यासाठी निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

दरम्यान,भारतीय जनता पार्टीच्या राज्य कार्यकारिणीत पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. पक्षाने सोपवलेल्या या महत्त्वपूर्ण जबाबदारीबद्दल त्यांनी चव्हाण यांचे मनःपूर्वक आभार मानले.

सदिच्छा भेटीदरम्यान पडळकर यांनी पक्षाने दिलेल्या विश्वासाचे भान ठेवून संघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्ण ताकदीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. “पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाची ताकद आहे. सर्वांना सोबत घेऊन आगामी काळात अधिक जोमाने काम करू,” असे त्यांनी यावेळी सांगितले.

या भेटीप्रसंगी आमदार महेश लांडगे आणि आमदार शंकर जगताप उपस्थित होते.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here