🔴
कोल्हापूर :
कोल्हापूर शहरात भरदिवसा घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना लक्ष्मीपुरी पोलिसांनी मोठी कारवाई करत देवघरातील चांदीच्या मूर्ती चोरणाऱ्या सराईत महिला चोरटीला अटक केली आहे. मानसी खरे (रा. देवणे कॉलनी, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून, तिच्याकडून तब्बल ३ लाख २५ हजार रुपयांच्या चांदीच्या मूर्ती जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित महिला अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चोरी करत होती. विशेषतः दुपारी एक ते चार या वेळेत, नागरिक वामकुक्षी घेत असताना ती लक्ष्य ठरवलेल्या घरांमध्ये शिरत असे. अनेक घरांचे दरवाजे केवळ ओढून घेतलेले असतात, याच निष्काळजीपणाचा फायदा घेत ती दबक्या पावलांनी घरात प्रवेश करत असे. घरातील सदस्य झोपेत असल्याची खात्री करून ती थेट देवघरात जाऊन पूजेसाठी ठेवलेल्या चांदीच्या मूर्ती व इतर मौल्यवान वस्तू पिशवीत टाकून पसार होत असे.
२३ डिसेंबर २०२५ रोजी शुक्रवार पेठेतील उदय देवरुखकर यांच्या घरातून १ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या मूर्ती चोरीला गेल्याची घटना घडली होती. यामध्ये मूर्तींवरील सोन्याचा किरीट आणि पाचूचे मणीही लंपास करण्यात आले होते. या घटनेनंतर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच गुप्त माहितीच्या आधारे संशयितावर लक्ष ठेवले. अखेर २१ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हे शोध पथकाने सापळा रचून मानसी खरे हिला ताब्यात घेतले. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र सखोल चौकशीत तिने शहरातील विविध भागांत चोरी केल्याची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली असता विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या सुमारे ३.२५ लाख रुपये किमतीच्या चांदीच्या मूर्ती हस्तगत करण्यात आल्या.
लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व गुन्हे शोध पथकाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली आहे. आरोपी महिलेने शहरातील आणखी किती ठिकाणी चोरी केली आहे, याचा तपास सुरू असून पुढील चौकशी चालू आहे.
टीप : बातमीतील व्यक्तीचा फोटो मूळ (Original) असून सादरीकरणासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.




