नर्ससोबतच्या प्रेमप्रकरणातून नामांकित डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न; ४५ झोपेच्या गोळ्या व १० बिअरचे सेवन

0
4


डोंबिवली :
डोंबिवली शहरातून वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नामांकित व वरिष्ठ डॉक्टरने आपल्या रुग्णालयातील परिचारिकेसोबत असलेल्या विवाहबाह्य प्रेमसंबंधांमधून निर्माण झालेल्या तणावातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित डॉक्टरने नैराश्याच्या भरात तब्बल ४५ झोपेच्या गोळ्या आणि १० बिअरचे सेवन केल्याचे उघड झाले आहे. सुदैवाने, वेळेवर उपचार मिळाल्यामुळे त्यांचे प्राण वाचले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित डॉक्टर व त्यांची पत्नी दोघेही वैद्यकीय व्यवसायात कार्यरत असून डोंबिवली पश्चिमेकडील विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांचे स्वतःचे रुग्णालय आहे. काही महिन्यांपासून डॉक्टरचे त्याच रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका परिचारिकेसोबत प्रेमसंबंध जुळल्याची माहिती त्यांच्या पत्नीला मिळाली होती. त्यानंतर पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होऊ लागले.


घरातील तणाव वाढल्यानंतर डॉक्टरने डोंबिवली पूर्वेकडील एका सोसायटीमध्ये स्वतंत्र राहण्यास सुरुवात केली. दरम्यान, संबंधित परिचारिकेने डॉक्टरांकडे विवाहासाठी आग्रह धरल्याचे समजते. मात्र, “माझे आधीच लग्न झाले आहे, त्यामुळे दुसरा विवाह शक्य नाही,” असा स्पष्ट नकार डॉक्टरांनी दिल्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. संपर्क तुटल्याने डॉक्टर मानसिक तणावाखाली गेल्याचे बोलले जात आहे.


घटनेच्या दिवशी डॉक्टर रुग्णालयात वेळेवर न पोहोचल्याने कर्मचाऱ्यांना संशय आला. मोबाईलवर संपर्क न झाल्याने एका कर्मचाऱ्याने त्यांच्या राहत्या घरी जाऊन पाहणी केली असता ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


या प्रकरणाची नोंद विष्णूनगर पोलिसांकडे करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. घटनेमुळे डोंबिवली परिसरात आणि वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


टीप : मानसिक तणाव, नैराश्य किंवा आत्महत्येचे विचार येत असल्यास त्वरित तज्ज्ञांची मदत घ्यावी. जवळच्या नातेवाईकांशी संवाद साधणे आणि समुपदेशन घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here