सोलापूर | सोलापूर शहरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून, सततच्या मानसिक छळाला आणि बदनामीच्या भीतीला कंटाळून पती-पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सोमनाथ धानोप्पा पाटील आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील (रा. सोलापूर) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दाम्पत्याने घातक द्रव्य सेवन करून जीवन संपवले. दोघांच्या प्रकृतीत अचानक बिघाड होऊन तोंडातून फेस येऊ लागल्याने घरातील लहान मुलांनी घाबरून काका नवनाथ पाटील यांना माहिती दिली. त्यानंतर तातडीने रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला.
घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट आढळून आली. या चिठ्ठीत विजयपूर येथील अभिषेक कोरे याचे नाव नमूद करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात संबंधित व्यक्तीकडून श्रीदेवी पाटील यांना एकतर्फी प्रेमातून वारंवार फोन व भेटींद्वारे त्रास दिला जात असल्याचे तसेच बदनामीची धमकी दिल्याचे नमूद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या सततच्या मानसिक तणावातून मार्ग न सापडल्याने दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला असून, सुसाईड नोटमधील उल्लेखाच्या आधारे संशयित अभिषेक कोरे याला ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
टीप : बातमीतील व्यक्तींचे छायाचित्र मूळ असून, सादरीकरणासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.




